पुणे : व्यापा-याचे अपहरण करुन 20 कोटींची खंडणी मागणा-या तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 11:59 AM2018-10-07T11:59:21+5:302018-10-07T11:59:28+5:30
टिंबर मार्केटमधून एका व्यापा-याचे अपहरण करुन 20 कोटी रुपयांची खंडणी मागणा-या तीन जणांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे. अपहृत व्यापा-याची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे.
पुणे - टिंबर मार्केटमधून एका व्यापा-याचे अपहरण करुन 20 कोटी रुपयांची खंडणी मागणा-या तीन जणांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे. अपहृत व्यापा-याची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. शनिवारी (6 ऑक्टोबर) संध्याकाळी या व्यापाऱ्याचं अपहरण करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, टिंबर मार्केटमधील एका व्यापा-याचे शनिवारी संध्याकाळी मोटारीतून अपहरण करण्यात आले. ही माहिती पोलिसांना संध्याकाळी 6.30 वाजता मिळाली व्यापा-याच्या जिवाचा प्रश्न असल्याने पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि खबरदारी घेऊन या प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणा-या या गुन्हेगारांनी त्यानंतर आपली मागणी कमी करीत 15 लाखांवर आणली. दरम्यान, गुन्हेगारांनी व्यापा-याला कोठे नेले आहे, याची माहिती घेण्याचे काम पोलीस करत होते.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीश सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख तसेच गुन्हे शाखेची सर्व पथके संपूर्ण पुणे शहरात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. त्याच दरम्यान मध्यरात्रीनंतर ते कात्रज परिसरात असल्याचे समजले. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरात पसरलेले गुन्हे शाखेचे युनिट कात्रज परिसरात एकवटले.
पोलिसांनी गुन्हेगारांनी ज्या गाडीतून व्यापा-याला पळवून नेले होते. ती गाडी शोधून काढली. ते या व्यापा-याला शिवापूरकडे घेऊन जात होते. चालत्या गाडीला ओव्हरटेक करुन पोलिसांनी चारही बाजूने ती गाडी घेरुन तिला थांबायला भाग पाडले. त्यातील व्यापा-याची आधी सुटका केली. त्यानंतर गाडीतील तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गावठी कट्टे आणि कोयते आढळून आले आहेत. गुन्हे शाखेने तिघांना पकडून खडक पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांच्या आणखी दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.