किडनी रॅकेट, भ्रष्टाचाराचे आरोप अन्... आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलणारे डॉ अजय तावरे नेमके कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 07:39 PM2024-05-27T19:39:16+5:302024-05-27T19:39:47+5:30

Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याच्या आरोपाखाली डॉ. अजय तावरे यांंना अटक करण्यात आली आहे.

Pune Accident Case charge of changing the blood samples of the accused Dr Ajay Taware arrested | किडनी रॅकेट, भ्रष्टाचाराचे आरोप अन्... आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलणारे डॉ अजय तावरे नेमके कोण?

किडनी रॅकेट, भ्रष्टाचाराचे आरोप अन्... आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलणारे डॉ अजय तावरे नेमके कोण?

Pune Porsche Accident Case : पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणात रोज नवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचे घेतलेले नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकल्याची माहिती पुणेपोलिसांनी दिली आहे. अपघातानंतर ससून रुग्णालयात आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार करण्यात आली. याप्रकरणी पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. डॉ. अजय तावरे यांनी फोन करुन रक्ताचे नमुदे बदल्याची सूचना श्रीहरी हाळनोर यांना दिली होती. त्यामुळे डॉक्टरांनी आरोपीच्या ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठवून प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली आणि दोघांना अटक करण्यात आली.

अपघातानंतर सकाळी ११ वाजता ससून रुग्णालयात आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. आरोपीच्या रक्ताचे नमुने ससून हॉस्पिटलच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकण्यात आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर लॅबमधील डॉक्टरांनी यावर अल्पवयीन आरोपीचे नाव टाकून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते. यामध्ये डॉ. अजय तावरे यांच्या सूचनेनुसार रक्ताचे नमुने बदल्याचे समोर आले आणि दोन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे अटकेत असलेले अजय तावरे हे याआधीदेखील अडचणीत सापडले आहेत.

कोण आहेत डॉ. अजय तावरे?

या अपघात प्रकरणामुळे चर्चेत आलेले डॉ. अजय तावरे यांची वादग्रस्त पार्श्वभूमी असल्याचे समोर आलं आहे. याआधी देखील डॉ. अजय तावरे यांच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. सध्या अजय तावरे हे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. ससूनमधील २०२२ च्या किडनी प्रकरणात डॉक्टर अजय तावरे यांची उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर तावरे यांची २९ डिसेंबर २०२३ मध्ये ससूनच्या अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी तावरे हे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. १९ एप्रिल २०२४ रोजी पुन्हा तावरे यांच्याकडून अधिक्षकपदाचा कारभार काढून घेण्यात आला. तसेच ससूनचे अधिक्षक असताना तावरे यांच्यावर अनेकदा आरोप झाले होते. यासोबत रुग्णालयात उंदराने चावा घेतल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या एका प्रकरणात तावरेंना निलंबित देखील करण्यात आलं होतं.

दरम्यान, आता अजय तावरेंसाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी २०२३ मध्ये शिफारस केल्याची माहिती समोर आली आहे. तावरे यांची ससूनच्या अधिक्षकपदी नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले होते. 

Web Title: Pune Accident Case charge of changing the blood samples of the accused Dr Ajay Taware arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.