'पुण्याचा अजेंडा आधीपासूनच तयार, आता आम्ही गती देऊ' देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधानं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 19:11 IST2024-12-14T19:11:41+5:302024-12-14T19:11:41+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,' पुणेकरांनी या पुस्तकांच्या प्रदर्शनाला जो प्रचंड प्रतिसाद दिला होता. तो खरोखर थक्क करणारा होता.'

'पुण्याचा अजेंडा आधीपासूनच तयार, आता आम्ही गती देऊ' देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधानं
पुणे : वाचन चळवळीला सक्षम करण्यासाठी आणि पुण्याला नवी ओळख देण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शनिवारी ( दि १४ ) झाले. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
माध्यमांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले,'पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि या सांस्कृतिक राजधानीमध्ये अतिशय महत्वाचा कार्यक्रम याठिकाणी वाचन संस्कृतीला चालना देण्याकरता होतो आहे. मागील वर्षी देखील या कार्यक्रमाला मी आलो होतो. पुणेकरांनी या पुस्तकांच्या प्रदर्शनाला जो प्रचंड प्रतिसाद दिला होता. तो खरोखर थक्क करणारा होता. आणि म्हणूनच यावेळेस निमंत्रण मिळाल्यानंतर मी निर्णय घेतला की, या कार्यक्रमाला आलं पाहिजे. मला असं वाटतं की सांस्कृतिक राजधानीत अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी सुरूवात होतेय ही खरोखर माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.'
यावेळी पत्रकारांनी पुण्याचा अजेंडा काय असणार ? असा प्रश्न विचारला असता ते पुढे म्हणाले, 'पुण्याचा अजेंडा हा आम्ही गेल्या अडीच वर्षात सेट केलेला आहे. आता त्या अजेंडाला गती देणं हे महत्वाचं आहे. ती गती आम्ही येत्या काळात देऊ.'
फडणवीस यांना दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्द्यांवरून प्रश्न विचारला असता ते म्हणाले,'माननीय न्यायालयाने मागच्या काळामध्ये निर्णय देऊन मंदिरांच्या कॅटेगरी केलेल्या आहेत आणि जुनी मंदिरं जी आहेत ती त्या कॅटेगरीप्रमाणे नियमित करता येतात त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्याठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू.' असेही ते म्हणाले.