पुणे-अहिल्यानगर रस्ता बनला मृत्यूचा महामार्ग; वर्षभरात ५३ जणांनी गमावले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:20 IST2024-12-24T14:20:08+5:302024-12-24T14:20:24+5:30
तब्बल ७२ अपघात अवजड वाहनांमुळे झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे ५३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

पुणे-अहिल्यानगर रस्ता बनला मृत्यूचा महामार्ग; वर्षभरात ५३ जणांनी गमावले प्राण
पुणे/वाघोली : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वारंवार घडत असलेल्या अपघातांमुळे हा मार्ग मृत्यूचा महामार्ग बनत असून, वर्षभरात जवळपास २०० लहान-मोठे अपघात झाले आहेत. त्यातील तब्बल ७२ अपघात अवजड वाहनांमुळे झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे ५३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
वाघोली पोलिस ठाण्यासमोरच केसनंद फाट्यावर पुण्याकडून येणाऱ्या बिल्टवेस इंटरप्राईजेस कंपनीच्या (एमएच१२ विएफ ०४३७) या डंपरने फूटपाथवर झोपलेल्या नऊजणांना चिरडले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे, तर सहाजण गंभीर जखमी झाले. जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना सोमवारी रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी घडली. डंपर चालक अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला स्वतःच्या पायावरदेखील उभा राहता येत नव्हते, एवढे मद्यप्राशन त्याने केले होते.
वैभवी रितेश पवार, वैभव रितेश पवार आणि विशाल विनोद पवार अशी मृतांची नावे आहेत, तर जानकी पवार, रिनिशा पवार, रोशन भोसले, नागेश पवार, दर्शन विराट, आलिशा पवार, अशी जखमींची नावे आहेत. जखमींना ससूनसह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी (दि. २२) रात्रीच ते अमरावती येथून बिगारी व मजुरी कामासाठी आले होते. जवळपास एकाच कुटुंबातील बाराजण फूटपाथवर झोपले होते. पन्नास ते शंभरजण फूटपाथच्या बाजूला झोपड्यात झोपले होते. यामध्ये महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतून हाताला मिळेल ते काम करणारे सर्व मजूर कामगार आहेत, तर काही भंगार गोळा करणारे आहेत.
डंपरचालक दारूच्या नशेत असल्याने त्याचे डंपरवरील नियंत्रण सुटले आणि डंपर थेट फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला. केसनंद फाट्यावरील ही दुर्घटना घडल्यानंतर घटनेमध्ये जखमी व मृत्यू झालेल्यांचे नातेवाईक हंबरडा फोडत होते. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी वीरेंद्र परमदासजी भोसले यांनी फिर्याद दिली असून, डंपर चालक गजानन शंकर तोट्रे (वय २६, रा. केसनंद, मूळ रा. नांदेड) याला अटक केली आहे. पुढील तपास वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलिस करीत आहेत.
अपघातातील चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, त्याच्यात अशी कलमे टाका की तो सुटता कामा नये. यानुसार चालकावर गुन्हा दाखल झाला असून, मालकावरदेखील गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी घटना घडल्यानंतर राज्य सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत दिली जाते. जर लहान मूल असेल तर रक्कम वेगळी दिली जाते. मी आजच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतो. जखमींचा संपूर्ण खर्च राज्य सरकारकडून केला जाईल. - अजित पवार, उपमुख्यमंत्री
मध्यरात्रीच्या सुमारास एका डंपर चालकाने दारूच्या नशेत डंपर चालवून नऊजणांना वाघोली परिसरात चिरडले. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, सहाजण गंभीर जखमी आहेत. या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीला आम्ही अटक केली आहे.
- मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त
वाघोली आणि परिसरात अनेक वर्षांपासून अपघातांची मालिका सुरू असून, वर्षभरात या अपघातात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला जबाबदार कोण ? लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही याचा जाब विचारणार असून, येणाऱ्या काळात या विरोधात मोठे जनआंदोलन उभारू
- माऊली कटके, आमदार, शिरूर हवेली.