कचरा जाळल्याने काेंडताेय शहराचा श्वास..!‘पुणे एअर एक्शन हब’ने महापालिकेला सादर केला अहवाल
By श्रीकिशन काळे | Published: November 30, 2024 09:28 AM2024-11-30T09:28:15+5:302024-11-30T09:28:30+5:30
‘पुणे एअर ऍक्शन हब’नी शहराला भेडसावत असलेल्या कचरा जाळण्याच्या प्रकरणाचा अभ्यास करून, त्याचा एक अहवाल बनविला आहे
पुणे : शहरामध्ये अनेक ठिकाणी कचरा जाळला जात असून, ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. याचा अभ्यास केला असता प्रातिनिधिक सर्व्हेनुसार, शहरातील ७५ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या आजूबाजूला अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे वारंवार कचरा जाळला जातो.
ज्याला हॉटस्पॉट म्हणू शकतो. कचरा जाळण्याचा त्रास दररोज सहन करावा लागतो, असे ३३ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. तर आठवड्यातून एक ते दोन वेळा कचरा जाळल्याचा त्रास होतो, असे ४२ टक्के लोकांचे म्हणणे आहे. याचा अहवाल ‘परिसर’ संस्थेने तयार केला असून, ताे महापालिकेला दिला आहे.
‘पुणे एअर ऍक्शन हब’नी शहराला भेडसावत असलेल्या कचरा जाळण्याच्या प्रकरणाचा अभ्यास करून, त्याचा एक अहवाल बनविला आहे. नागरिकांना या समस्येची जाणीव असली तरी तक्रार प्रक्रियेची माहिती नसल्याचे दिसून आले आणि त्यासाठी जाणीव जागृतीची गरज आहे. सर्वेक्षणाबरोबरच पुणे मनपाकडे यापूर्वी दाखल झालेल्या तक्रारींचे विश्लेषण केले असता, मनपाकडून कारवाईला विलंब होत असून, अंमलबजावणी प्रक्रियाही सदोष आहे, असे दिसून आले.
शहरातील वायू प्रदूषणात भर घालणाऱ्या कचरा जाळण्याच्या घटनांबाबतचा सविस्तर अहवाल ‘पुणे एअर एक्शन हब’ यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज एम. आणि घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख संदीप कदम यांना सादर केला. संस्थेने शिफारसींसह अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही सादर केला आहे.
दंडात्मक कारवाईच नाही
कचरा जाळण्याच्या घटनांची माहिती घेण्यासाठी ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान वॉर्डस्तरीय सर्वेक्षण केले. यात १५ वॉर्डातील २९४ नागरिकांचे म्हणणे नाेंदविण्यात आले आहे. नागरिकांनी कचरा जाळण्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारींचे विश्लेषण केले. यातून यंत्रणेतील त्रुटी स्पष्ट झाल्या. सर्वेक्षणात सहभागी एकूण २९२ पैकी ५५ नागरिकांनी यासंबंधी तक्रार नोंदवली. तक्रारींचे विश्लेषण केले असता ७५ टक्के तक्रारी दाखल झाल्यापासून दोन दिवसांच्या नंतर निकाली लागल्याचा शेरा आहे. मात्र ५९ पैकी एकाही तक्रारीमध्ये दंडात्मक कारवाई केलेली आढळली नाही.
उपाययाेजनाच नाही
नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलच्या एका निकालपत्राची माहिती देत पुणे एअर ॲक्शन हबचे सदस्य पुष्कर कुलकर्णी म्हणाले, “या निकालानुसार शहरातील कचरा जाळण्याच्या घटना आणि त्यावरील कारवाईचा मासिक अहवाल पुणे मनपाने आपल्या वेबसाइटवर देणे बंधनकारक आहे. सहा महिने उलटून गेले तरी त्याचे पालन अद्याप होत नाही. कचरा जाळण्याला त्वरित आळा घालण्यासाठी भरारी पथके स्थापन केली नाहीत. बहुतेकवेळा कचरा जाळण्याच्या घटना संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी विशिष्ट ठिकाणांवर होतात, त्यामुळे रात्रीची गस्त वाढविण्याची आणि त्यावेळी प्रतिसाद यंत्रणा सक्रिय ठेवणे गरजेचे आहे.”
तक्रारींची नाेंद केवळ २० टक्के
कचरा जाळण्याच्या घटना अधिक प्रमाणात आढळलेल्या जागांची माहिती देताना श्वेता वेर्णेकर म्हणाल्या, “हडपसर-मुंढवा, औंध बाणेर, वानवडी रामटेकडी या काही वॉर्डांमध्ये अशा अधिक घटना होत असल्याचे सर्वेक्षणात आढळले.” परंतु कचरा जाळण्याचे प्रकार पाहणाऱ्या, माहिती असणाऱ्या नागरिकांना सतत त्रास सहन करावा लागत असला तरी केवळ २० टक्के नागरिकांनी तक्रार नोंदवली होती असे दिसून आले.
अहवालातील सूचना
1. कचरा जाळण्यासाठी 24x7 समर्पित तक्रार क्रमांक हवा.
2. तक्रारी दाखल झाल्यानंतर तत्काळ कारवाईसाठी प्रतिसाद पथके / दल हवे.
3. तक्रार नोंदविल्यावर त्याचे निवारण करण्यास विलंब का होतो ते तपासावे.
4. तक्रार क्रमांक आणि तक्रार नोंदवण्याच्या प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करावी.
5. जिथे कचरा वारंवार जाळला जातोय त्याचे मॅपिंग करावे.
6. कचरा जाळण्याच्या धोक्यांबद्दल मनपा कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता हवी.
नागरिकांचे सर्वेक्षण :
१) ७५ टक्के लोक म्हणतात - कचरा जाळला जातो
२) ३३ टक्के लोक म्हणतात - दररोज त्रास होतो
३) ४२ टक्के लोक म्हणतात - आठवड्यातून दोनदा प्रकार होतो
४) ५९ तक्रारींपैकी एकावरही दंडात्मक कारवाई नाही