पुणे विमानतळ होणार कोरोना लस वाहतुकीचे ‘हब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:35 AM2021-01-08T04:35:06+5:302021-01-08T04:35:06+5:30
पुणे : देशभरात लवकरच कोरोना लसीकरण सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटमधून देशभरात लस वितरण होणार आहे. ...
पुणे : देशभरात लवकरच कोरोना लसीकरण सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटमधून देशभरात लस वितरण होणार आहे. केंद्र सरकारने प्रवासी विमानातून लस वाहतुकीला परवानगी दिल्याने पुणे विमानतळ लस वाहतुकीचे ‘हब’ बनणार आहे. पुण्यातून विमानाने दिल्ली, चेन्नई, बेंगलुरू, हैद्राबाद, कोलकाता यांसह अन्य प्रमुख शहरांमध्ये लस पोहचविली जाईल.
केंद्र सरकारने कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. कोविशिल्ड लसीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटमध्ये केले जात आहे. आतापर्यंत सुमारे ५ कोटींहून अधिक लसींचे उत्पादन करण्यात आले आहे. देशात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. कोविशिल्ड लस तयार असल्याने पुण्यातून देशभरात लसीचे वितरण होणार आहे. केंद्राने दिल्ली, कर्नाल, चेन्नई, हैद्राबाद व कोलकाता या शहरांत लस साठवणुकीचे प्रमुख केंद्र केल्याचे समजते. पुण्यातून विमानाने या शहरांमध्ये लस पाठविली जाईल. तसेच अन्य काही प्रमुख शहरांमध्येही लसीचे वितरण होण्याची शक्यता आहे.
चौकट
वाहतूक केवळ दिवसाच?
पुणे विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेतच सुरू असते. रात्री बारा तास धावपट्टीच्या कामासाठी विमानतळ बंद ठेवले जाते. त्यामुळे लसीची वाहतुक सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेतच होण्याची शक्यता आहे. आवश्यकता भासल्यास रात्रीच्या वेळीही वाहतुक करण्याची सोय उपलब्ध आहे.
चौकट
“प्रवासी विमानातून वाहतुकीला मान्यता मिळाल्याने प्रवाशांसह लसीची वाहतूक केल्यास वाहतुक क्षमता कमी होईल. विमानातील सीट काढून विनाप्रवासी लसीची वाहतुक केल्यास अधिक वाहतूक होऊ शकते. ही लस अधिक संवेदनशील असल्याने त्याचीच शक्यता अधिक वाटते. विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवासी विमानांना केवळ कार्गो वाहतुकीसाठी परवानगी मिळू शकते. एप्रिल महिन्यात अशी परवानगी देण्यात आली होती. हवाई दलाच्या विमानांचाही वापर केला जाऊ शकतो.”
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतुक तज्ज्ञ
चौकट
असे होईल लस वितरण
लस उत्पादक सिरम इन्स्टिट्यूट - विमानतळ - शासकीय लस साठवणूक केंद्र - शीत व्हॅन - जिल्हा लस केंद्र - शीत व्हॅन - प्राथमिक आरोग्य केंद्र - उपकेंद्र - प्रत्यक्ष लसीकरण