पुणे विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव; मोहोळ यांच्या संकल्पनेला फडणवीसांचा हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 06:11 PM2024-09-21T18:11:48+5:302024-09-21T18:12:40+5:30
येत्या कॅबिनेटला आम्ही नामकरणचा प्रस्ताव मांडून मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवणार
पुणे : पुण्यात जे नव्या पद्धतीने विमानतळ बनवण्यात आलंय, त्याचं नामकरण जगदगुरू तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावे, अशी संकल्पना राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. त्या संकल्पनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
पुण्यात महर्षी कर्वे शिक्षण संस्था येथे पुणे जिल्हयातील प्रकल्पांचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार मुरलीधर मोहोळ, सुप्रिया सुळे चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
नवीन विमानतळ तयार करण्यात येणार आहे, त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचं आहे. परंतु नव्या विमानतळाला जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव पुणे विमानतळाला देण्यात येणार आहे. मुरलीधर मोहोळ यांनी नावासंदर्भातील प्रस्ताव सरकारला दिला होता, तो आम्ही स्वीकारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी येत्या कॅबिनेटला आम्ही तो प्रस्ताव मांडून मंजूर करून घेणार आहोत. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत. हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी मोहोळ आणि नितीनजी गडकरी यांची असेल असंही त्यांनी सांगितलं आहे. जगदगुरू तुकाराम महाराजांचं नाव विमानतळाला दिलं, तर त्याचा सगळ्यांना आनंद होईल, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, जनतेच्या आशीर्वादामुळे मला संसदेत काम करण्याची संधी मिळाली. गडकरी साहेबांकडे कधीही काम घेऊन गेलं तर ते कधीही पक्ष बघत नाहीत. ते काम बघतात. त्यामुळे मी बारामती मतदार संघाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानते. गडकरी साहेबांच्या कामाबरोबरच कामाच दर्जाही चांगला असतो. त्यांनी केलेल्या रस्त्याच्या कामाला पुन्हा कधीही खड्डे अजिबात दिसत नाहीत. त्यांनी केलेली कामे दुरदृष्टीने झाली आहेत.
राजकारण बाजूला ठेवून तोडगा काढू
पुण्यातून हिंजवडीला जात असताना प्रचंड ट्राफिक होत असते. तासनतास लोक ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतात. प्रशासनाकडे अनेक वेळा फॉलो अप केला आहे. पुण्याचे ट्राफिक याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यायला हवे. ट्राफिकवर सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून तोडगा काढायला हवा असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं आहे.