Pune Airport: टग ट्रकच्या धडकेत विमानाला भगदाड; १८० प्रवासी वाचले; पुणे ते दिल्ली विमानाचा अपघात टळला
By अजित घस्ते | Published: May 17, 2024 08:04 PM2024-05-17T20:04:01+5:302024-05-17T20:04:37+5:30
हवाई वाहतूक मंत्र्यानी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे
पुणे : पुण्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानाला पुश बॅक टग ट्रकची रनवे वरच धडक बसल्याने मोठा अपघात झाला. या धडकेमुळे विमानाला भगदाड पडल्याचे समोर आले आहे. यावेळी विमानातून १८० प्रवासी प्रवास करत होते, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
पुणे विमानतळावरून एअर इंडीया कंपनीचे विमान सायंकाळी ४ ते सव्वाचारच्या सुमारास दिल्लीकडे झेप घेण्यास सज्ज झाले होते. ते पार्कींगमधून रन वे वर येत असतानाच प्रवाशांची सामाने वाहून नेणार्या पुशबॅक मागून टग ट्रकने धडक मारली. आणि या पुणे-दिल्ली विमानाला भगदाड पडले. याची माहिती तात्काळ विमान कर्मचार्यांनी विमान अधिकार्यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत विमानतळ प्रशासनाने ही विमानसेवा रद्द करून एअर इंडीयाची रात्रीची ९:५५ वाजता पुणे ते दिल्ली या पर्यायी विमानसेवा प्रवाशांना व्यवस्था करून देण्यात आली.
या विमानाचा हा अपघात कशामुळे झाला, याची कारणे काय आहेत. याचा तपास करण्यासाठी हे विमान पुणे विमानतळावरच ठेवण्यात आले आहे. विमानतळावरील सुरक्षेशी संबंधित असलेल्या यंत्रणांकडून याचा तपास सुरू झाला आहे. याबाबत एअर इंडीयाच्या प्रवक्त्यांशी संपर्क करण्यात आला. त्यांनी ही घटना घडली असल्याचे सांगत, घटनेच्या सत्यतेला दुजोरा दिला. मात्र, याबाबत वरिष्ठ पातळीवरून कोणतेही स्टेटमेंट आले नाही. या बाबत याबाबत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्या संपर्क साधला त्यांनी याबाबत प्रतिसाद दिला नाही. बोलण्यास नकार दिला.
टॅक्सी चालवण्याच्या प्रक्रियेदरम्यान विमानाला जमिनीवर चालवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टग ट्रकने विमानाला धडक दिल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डिरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हील एव्हीएशन, डीजीसीए) या विमानाची तपासणी सुरू आहे.
पुणे लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ही घटना अत्यंत गंभीर आहे. यामुळे पुणे विमानतळावरील प्रवासी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विमानतळ प्रशासनाने घटनेचा अभ्यास करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. हवाई वाहतूक मंत्र्यानी याकडे गार्भीयपुर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ