संपूर्ण एअरपोर्ट रस्त्यावर रंगांची उधळण ; ताम्हण पुष्पांनी रस्ता फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 05:13 PM2018-04-27T17:13:56+5:302018-04-27T17:13:56+5:30
ताम्हण खरे तर महाराष्ट्राचे राज्यपुष्प असूनही त्याची लागवड कमी होत चालली आहे. असे असताना पुण्यातील कांतीलाल लुंकड फाउंडेशन चालवत असलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
पुणे : एकीकडे हिरवाईचा टक्का कमी होत असताना पुण्यातील एअरपोर्ट रस्ता मात्र गुलाबीसर ताम्हणाच्या फुलांनी सजला आहे. ऐन उन्हाळ्यात रस्त्यावर उभा असणारा रंगीत फुलोरा प्रत्येकाचे मन मोहून घेत आहे.
सुमारे ४० लाख लोकसंख्या असणाऱ्या पुणे शहरात दिवसेंदिवस झाडांचे प्रमाण कमी होत आहे. सिमेंटचे जंगल वाढताना आहेत या झाडांकडेही पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यातच उन्हाळ्यात शहराला पाणी पुरवताना महापालिकेची दमछाक होताना झाडांना पाणी पुरवण्याकडे काहीसे दुर्लक्षही होते. त्यामुळे शहरातील अनेक दुभाजकांवर लावलेली झाडे कोमेजून जाताना एअरपोर्ट रस्ता मात्र बहरला आहे. या रस्त्यावर कांतीलाल लुंकड फाउंडेशनच्यावतीने चार वर्षांपूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यावेळी कोणतंही विदेशी झाड लावण्यापेक्षा महाराष्ट्राचे राज्यपुष्प असलेल्या ताम्हण झाडाची निवड करण्यात आली. चार वर्ष या झाडांची काळजी घेण्यात आली. या श्रमांना आता यश आले असून ऐन उन्हाळ्यात झाडे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधत आहेत. एअरपोर्टचा नवा रस्ता ते सिम्बायोसिस कॉलेजच्या दरम्यान ही २०० लावण्यात आली आहेत.
याबाबत संजय येलपुरे यांनी माहिती दिली असून त्यांनी झाडांना केवळ शेणखत टाकल्याने झाडांची नैसर्गिक वाढ झाल्याचे सांगितले. पुण्यात कुठेही एकाच परिसरात इतके ताम्हण लावण्यात आले नसल्याने आम्ही याच वृक्षाची निवड केल्याचे ते म्हणाले. राहुल बागले यांनी झाडांसोबत आजूबाजूच्या परिसंस्थेचे यात अभ्यास केला असून विदेशी झाडांपेक्षा भारतीय झाडांवर पक्षी घरटी बांधत असल्याने या झाडाची निवड केल्याचे स्पष्ट केले. दत्ता निकाळजे यांनी वर्षभर झाडांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून त्यासाठी फाउंडेशनने दोन टँकरच विकत घेतल्याचे सांगितले.विदेशी झाडांचे आयुष्य कमी असून त्यांच्या वाढीसाठी अधिक काळजी घ्यावी लागते.अशावेळी महाराष्ट्रात मूळ असलेली झाडे लावण्यावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले.