लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून ठप्प असलेले पुणे विमानतळ उड्डाणासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 09:05 PM2020-05-21T21:05:23+5:302020-05-21T21:10:32+5:30
देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीला केंद्र सरकारने दाखविला हिरवा कंदील
पुणे : देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला असून पुणेविमानतळही विमान उड्डाणांसाठी सज्ज झाले आहे. पण अद्याप विमानतळावर दररोज किती विमानांचे उड्डाण होणार, किती व कोणत्या शहरातून विमाने उतरणार, याची माहिती विमानतळ प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. ही माहिती मिळाल्यानंतर पुणे विमानतळाबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून विमानसेवा ठप्प आहे. पण ही सेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने हो असल्याने नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दि. २५ मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याची घोषणा गुरूवारी केली. ही सेवा सुरू करण्यासाठी नियमावलीही तयार करण्यात आली आहे. तसेच विमानांचे कमाल व किमान तिकीट दरही निश्चित करण्यात आले आहेत. यापार्श्वभुमीवर पुणे विमानतळही विमान वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे. विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी याबाबत ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. विमानतळावर सध्या स्वच्छतेबाबतचे सर्व प्रोटोकॉल पाळले जात आहेत. विमानतळावर प्रवेशासाठी मास्क, हातमोजे, सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे. त्यादृष्टीने विमानतळावर प्रवेशद्वारावरच या वस्तुंच्या विक्रीची सोय केली जात आहे. विमानतळ इमारतीमध्ये प्रवाशांचे थर्मल स्क्रिनींग करूनच प्रवेश दिला जाणार आहे. कोणतीही लक्षणे असलेल्या प्रवाशांना परत पाठविले जाईल. या तपासणीसाठी स्वतंत्र कर्मचारी असतील. मोबाईलमध्ये आरोग्य सेतु अँप डाऊनलोड करणेही आवश्यक आहे.
एखादी वस्तु, खाद्यपदार्थ खरेदी करताना अधिकाधिक डिजिटल व्यवहार व्हावेत, यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. विमानतळावर प्रवासी आल्यानंतर त्यांच्यामध्ये सुरक्षित अंतर राहावे, यासाठी ठिकठिकाणी खुणा करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी स्टीकर्स चिटकविण्यात आले आहेत. ट्रॉलींची स्वच्छताही सातत्याने कील जात आहे. तरीही संपर्क टाळण्यासाठी ट्रॉलीचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी कमीत कमी सामान आणावे, अशी अपेक्षा आहे.
----------------------
अद्याप वेळापत्रक नाही
विमानसेवा सुरू होणार असली तरी पुणे विमानतळावरून कोणत्या शहरांसाठी किती विमानांचे उड्डाण होणार, किती विमान उतरणार याचे वेळापत्रक विमानतळ प्रशासनाला मिळालेले नाही. त्यामुळे विमान उड्डाणांची स्थिती गुलदस्त्यात आहे. विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनीही याला दुजोरा दिला.
-------