Breaking : पुणे विमानतळ २६ ऑक्टोबरपासून रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत वर्षभर बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 02:07 PM2020-10-06T14:07:48+5:302020-10-06T17:56:13+5:30
वर्षभर हवाईदलामार्फत धावपट्टी दुरुस्तीचे काम सुरु राहणार
पुणे : धावपट्टीच्या देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी पुणेविमानतळ रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत पुढील वर्षभर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दि. २६ ऑक्टोबरपासून रात्रीच्यावेळी ये-जा करणाºया विमानांच्या वेळापत्रक बदलण्यात आले आहे. ही विमाने आता दिवसा उड्डाण करतील, अशी माहिती विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी दिली.
पुणे विमानतळ हे हवाई दलाचे असून धावपट्टीची देखभाल-दुरूस्तीही त्यांच्याकडूनच केली जाते. तसेच हवाई दलाच्या सरावादरम्यानही काही दिवसांपर्यंत विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी सकाळी बंद ठेवावे लागत होते. आता दि. २६ ऑक्टोबरपासून हवाई दलाकडून धावपट्टीच्या देखभाल-दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. हे काम दररोज रात्री ८ ते सकाळी ८ यावेळेत पुढील वर्षभर सुरू राहणार आहे. सध्या यावेळेत विमानतळावरून २६ विमाने ये-जा करतात. धावपट्टीच्या कामांमुळे या विमानांच्या वेळा सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. सध्या पुणे विमानळावरून दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, बेंगलुरू, नागपुर, कोची, लखनौ, हैद्राबाद आदी मोजक्याच शहरांमध्ये विमानांची ये-जा सुरू आहे.
कुलदीप सिंग म्हणाले, धावपट्टीच्या दुरूस्तीचे काम केले जाणार असल्याने रात्रीच्या वेळी प्रवासी वाहतुक होणार नाही. पण त्यामुळे एकही विमान उड्डाण रद्द होणार नाही. रात्रीची सर्व विमाने दिवसाच्या वेळापत्रकामध्ये ये-जा करतात. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या विमानतळावर आम्ही केलेल्या इमारतीच्या अभ्यासानुसार सोशल डिस्टन्सिंगमध्ये एका तासात जास्तीत जास्त ५०० प्रवासी ये-जा करू शकतात. तर एका तासात केवळ ४ विमानांचे उड्डाण व ४ विमाने उतरू शकतात. त्यामुळे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुमारे ९० विमानांची ये-जा होऊ शकेल. सध्या हवाई दलाच्या विमानांचा सराव बंद आहे, त्यामुळे सकाळीही प्रवासी वाहतुक सुरू आहे.
---------------
विमानतळ प्राधिकरणाच्या नियमांनुसार सध्या प्रवासी वाहतुकीवर काही बंधने आहेत. त्यामुळे रात्री धावपट्टी बंद असली तरी फारसा परिणाम होणार नाही. तसेच काम लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी हवाई दलाला विनंती करणार आहोत.
- कुलदीप सिंग, विमानतळ संचालक
----------------
दररोज सुमारे ९ हजार प्रवासी
सध्या दररोज ९ हजार प्रवासी ये-जा करत आहेत. २०१८-१९ मध्ये ही संख्या वर्षाला ९० लाख एवढी होती. त्यानंतर त्यामध्ये मागील वर्षी ८० लाखापर्यंत घट झाली. कोरोना संकटामुळे विमान उड्डाणाला मर्यादा असल्याने जवळपास दररोज ९० विमानांचीच ये-जा होत आहे. पुर्वी हा आकडा १८० च्या जवळपास होता.
------------