पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार; ४७५ कोटी खर्च, 'असे' आहे नवीन टर्मिनल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 12:27 PM2024-06-29T12:27:50+5:302024-06-29T12:30:03+5:30
सीआयएसएफच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या टर्मिनलचा प्रत्यक्ष वापर सुरु झाला नव्हता. आता हे नवे टर्मिनल लवकरच सुरू होणार आहे.....
पुणे : आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने साकारलेले टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुले होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सीआयएसएफचे मनुष्यबळ गृहविभागाकडून मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे विमानतळावरुन होणाऱ्या उड्डाणांची गरज लक्षात नवे टर्मिनल तयार करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याचे उद्घाटनही झाले. मात्र सीआयएसएफच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या टर्मिनलचा प्रत्यक्ष वापर सुरु झाला नव्हता. आता हे नवे टर्मिनल लवकरच सुरू होणार आहे.
राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, ‘नवे टर्मिनल लवकरात लवकर वापरात आणण्यासाठी केलेल्य प्रयत्नांना यश आले असून पुणे विमानतळासाठी २२२ विविध पदांना मंजुरी मिळाली आहे. ही पदे वेगवेगळ्या ७ प्रकारांची आहेत. या नव्या संख्येसह पुणे विमानतळासाठी आता सीआयएसएफच्या मनुष्यबळाची संख्या ७१५ वर गेली आहे. नव्या टर्मिनलसाठी आवश्यक असणारी संख्या आता पूर्ण झाली असून नवे टर्मिनल वापरात आणण्यात आता कोणताही अडथळा उरलेला नाही. त्यामुळे हे टर्मिनल लवकरात लवकर खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
असे आहे नवीन टर्मिनल...
एकूण क्षेत्रफळ - ५२ हजार चौरस मीटर
वार्षिक प्रवासी क्षमता - ९० लाख
वाहनतळ चारचाकी क्षमता - १ हजार
प्रवासी लिफ्ट - १५
सरकते जिने - ८
एकूण खर्च – ४७५ कोटी रुपये