Pune Ambil Odha : भाजपची पुणेकरांसमोरील प्रतिमा डागाळण्यासाठीच राष्ट्रवादीने घडवून आणली आंबील ओढा कारवाई : भाजपचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 09:15 PM2021-06-28T21:15:08+5:302021-06-28T21:16:46+5:30
पण आम्ही कदापि राष्ट्रवादीचा हा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही: भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक
पुणे : राष्ट्रवादी आघाडीला पंधरा वर्षात जेवढा पुण्याचा विकास करता आला नाही.त्यांच्या काळात वर्षानुवर्षे केवळ कागदावर असलेल्या योजना भाजपच्या गेल्या चार वर्षांच्या काळात गतिमान झाल्या. विकासकामांचे आव्हान पेलण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये क्षमता नाही. त्यामुळेच भाजपची पुणेकरांसमोरील प्रतिमा डागाळण्यासाठी आंबील ओढा येथे राष्ट्रवादीने काँग्रेसने कारवाई घडवून आणली. मात्र, आम्ही कदापि राष्ट्रवादीचा हा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही अशा शब्दात भाजप पुुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी इशारा दिला आहे.
पुण्यातील आंबील ओढा येथील कारवाई प्रकरणी चांगलेच राजकारण पेटले आहे.पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान सुरु आहे. आता भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मुळीक म्हणाले, सहा महिन्यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. साम, दाम, दंड, भेद या सर्वप्रकारच्या नीतींचा अवलंब करून या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे. याच उद्देशाने प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून आंबील ओढा परिसरातील नागरिकांवर अवैध पद्धतीने कारवाई करण्यात आली. ज्यामुळे निष्पाप रहिवाशांना बेघर व्हावे लागले. नागरिकांना रस्त्यावर आणणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला पुढील निवडणुकीत पुणेकर रस्त्यावर आणतील.
पुण्याचा विकास करायला भाजपा सक्षम आहे. हे आव्हान पेलण्याची क्षमता राष्ट्रवादी कॉंग्रेसची नाही. त्यामुळेच प्रशासनातील काही अधिकार्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपची विकासाची प्रतिमा डागाळण्यासाठी अवैध मार्गाने आंबील ओढा परिसरातील रहिवाशांवर कारवाई करून त्यांना रस्त्यावर आणले. याचा राग पुणेकरांमध्ये असून त्याचे प्रत्यंतर आज आले. माझ्यासोबत प्रशासनाशी चर्चा करायला चला ही खासदार सुप्रिया सुळे यांची विनवणी आंबील ओढा कारवाईसाठी आंदोलन करणाऱ्या पुणेकरांनी धुडकावून लावली. राष्ट्रवादीने पुणेकरांबरोबरचे हे कुटील राजकारण थांबवावे असा इशाराही मुळीक यांनी दिला आहे.