Pune News: विद्येच्या माहेरघरात अग्रेसर असं पुणे; दुर्दैवाने कौटुंबिक हिंसाचारात टॉपला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 02:34 PM2023-07-30T14:34:19+5:302023-07-30T14:35:57+5:30
गेल्या ६ महिन्यांत पुण्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या (Domestic Violence) 296 घटनांची नोंद, त्यापाठोपाठ मुंबई आणि नागपूरचा क्रमांक
नम्रता फडणीस
पुणे : विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहर, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ असा पुण्याचा नावलौकिक; पण, दुर्दैवाने आता ‘सर्वाधिक कौटुंबिक हिंसाचार’ करणारे शहर अशी नवीन ओळख निर्माण हाेत आहे. राज्यात अन्य शहरांच्या तुलनेत कौटुंबिक हिंसाचारात (Domestic Violence) पुणे अग्रेसर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
अधिक माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत पुण्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या 296 घटनांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मुंबई आणि नागपूरचा क्रमांक लागताे. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सहा महिन्यांत विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक देण्यासंबंधीचे ३१२ गुन्हे नोंदविले गेले आहेत. याचाच अर्थ महिलांवरील अत्याचारातही पुणे उणे नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोना काळामध्ये महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना प्रकर्षाने समोर आल्या. दिवसागणिक हे प्रमाण वाढतच चालले आहे. केंद्राच्या आकडेवारीनुसार ४५ टक्के भारतीय स्त्रियांना त्यांचे नवरे थोबाडीत मारतात, लाथा मारतात किंवा मारहाण करतात. ३२ टक्के नवऱ्यांनी पत्नी गरोदर असताना तिच्याविरोधात हिंसाचार केलेला आहे. भारतात दर ६० मिनिटांनी एक स्त्री कौटुंबिक हिंसेमुळे दगावते. सामाजिक संकेतांमुळे स्त्रिया कौटुंबिक हिंसाचार सहन करतात. तसेच संस्कृतीची बंधने आणि आर्थिक परावलंबित्व यामुळे स्त्रियांना पतीच्या घरी राहणे भाग पडत असल्याचे दिसते. मात्र यातील दुर्दैवी बाब म्हणजे पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरातही महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे.
सहा महिन्यांत 312 गुन्ह्यांची नोंद
पुण्यात गेल्या सहा महिन्यांत कौटुंबिक हिंसाचारांतर्गत एकूण 312 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मेमध्ये हे प्रमाण 249 इतके होते. गतवर्षी जूनमध्ये 201 गुन्हे नोंदविले होते. वर्षभरातच 100 पेक्षा अधिक गुन्हे वाढले आहेत. पुण्यापाठोपाठ मुंबईमध्ये 276, तर नागपूरमध्ये 260 गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांमध्ये होणाऱ्या कौटुंबिक छळास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 व नियम 2006 संपूर्ण भारतात लागू केला आहे. या कायद्याच्या जनजागृतीमुळे कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे, ही काहीअंशी जमेची बाजू म्हणता येत असली तरी काही महिला या कायद्याचा गैरवापर करीत असल्याचेही दिसून येत आहे.
हा आहे, कौटुंबिक हिंसाचार, वेळीच ओळखा आणि जागे व्हा!
- भाषिक किंवा भावनिक हिंसाचार
- आई-वडिलांवर आरोप करणे / त्यांचा अपमान करणे
- शिवीगाळ करणे (नेम-कॉलिंग)
- चारित्र्यावर किंवा वर्तनावर आरोप करणे
- हुंडा न दिल्याबद्दल अपमान करणे
- मुलगा जन्माला न घातल्याबद्दल अपमान करणे
- शाळा, कॉलेज किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेत उपस्थिती लावण्यास प्रतिबंध करणे
- नोकरी करण्यास प्रतिबंध करणे
- नोकरी सोडण्यासाठी जबरदस्ती करणे
- स्वत:च्या किंवा मुलांच्या देखभालीसाठी पैसे न देणे
- मुलांना अन्न, कपडे, औषधे न पुरवणे
- घरातून जबरदस्तीने बाहेर काढणे
- थोबाडीत मारणे, मारहाण करणे, आपटणे
- लाथा मारणे, बुक्के मारणे, ढकलणे, लोटून देणे
- जबरदस्तीने शारीरिक संभोग करणे
- पोर्नोग्राफी किंवा अन्य काही अश्लील साहित्य किंवा चित्रे बघण्याची जबरदस्ती करणे.
काही महिलांकडून कायद्याचा गैरवापर
कौटुंबिक हिंसाचाराच्या व्याख्येची व्याप्ती मोठी आहे. यात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हिंसाचाराचाही समावेश आहे. कोरोना काळापासून महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुरुषांच्या मनात महिलांविषयी आदर राहिलेला नाही. अनेक पुरुषांना पत्नी ओझे वाटू लागली आहे. कायद्याविषयी महिला जागृत झाल्याने त्या तक्रार करण्यास पुढे येत आहेत. पण, हेही तितकेच खरे आहे की, काही महिला कायद्याचा गैरवापर करीत आहेत. परिणामी, ज्या महिला खराेखर पीडित आहेत, त्यांच्यावर अन्याय होत आहे. - ॲड. स्मिता भोसले