Pune: कोंढव्यात ATS ची छापेमारी, एकाच व्यक्तीजवळ सापडले ३७८८ सिमकार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 04:51 PM2024-08-29T16:51:51+5:302024-08-29T16:52:08+5:30
७ सिम बॉक्स, ३७८८ सिम कार्ड, ९ वाय-फाय राऊटर, सिमबॉक्स चालविण्यासाठी अँटिना, सिमबॉक्स चालू राहण्यासाठी लागणारं इन्व्हर्टर, लॅपटॉप या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत
किरण शिंदे
पुणे: पुण्यातला कोंढवा परिसर मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे.. याच परिसरातून काही महिन्यापूर्वी इस्लामिक स्टेटचे महाराष्ट्र मॉड्युल दहशतवाद विरोधी पथकाने उध्वस्त केले.. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे पुढे दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याचे निष्पन्न झाले. इतकच नाही तर यातील काही आरोपींनी बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षणही घेतलं असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यांनी काही ठिकाणी रेकीही केली होती हे देखील समोर आलंय. त्यामुळे या कोंढव्यातून दहशतवादाला खतपाणी घातलं जातय का असा प्रश्न विचारला जात होता. आणि असं असतानाच याच पुन्हा एकदा दहशतवाद विरोधी पथकानं छापेमारी केलीय. यावेळी त्यांना एकाच व्यक्तीच्या घरात तब्बल ३७८८ सिमकार्ड सापडलीत. त्यामुळे पुन्हा एकदा संशय बळावलाय.
नौशाद अहमद सिद्दिकी हा३२ वर्षाचा हा तरुण कोंढवा परिसरातील एका इमारतीत पत्नी आणि मुलासह राहत होता. काही दिवसांपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाला नौशादच्या घरातून बेकायदा टेलिफोन एक्सचेंज सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एटीएसच्या पथकाने २४ ऑगस्ट रोजी या ठिकाणी छापा टाकला. या छापा कारवाईत एटीएस च्या पथकाला बरच काही संशयास्पद सामान सापडलं. यामध्ये ७ सिम बॉक्स, ३७८८ सिम कार्ड, ९ वाय-फाय राऊटर, सिमबॉक्स चालविण्यासाठी अँटिना, सिमबॉक्स चालू राहण्यासाठी लागणारं इन्व्हर्टर, लॅपटॉप या सर्व वस्तू जप्त करण्यात आले आहेत.
या सर्व वस्तूंचा वापर करून या ठिकाणी बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज सुरू होतं. आणि या ठिकाणी बहुतांश बाहेर देशातून फोन येत असावेत असा अंदाज वर्तवला जातोय. अर्थात हा सर्व तपासाचा भाग आहे. प्राथमिक तपासानुसार पैसे कमावण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर सिम बॉक्सच्या सहाय्याने नौशाद अहमद सिद्दिकी हा अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालवत असल्याचं निष्पन्न झालंय. सध्या तरी एटीएसने त्याच्या विरोधात दूरसंचार विभाग, भारत सरकार आणि मोबाईल कंपन्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हे टेलिफोन एक्सचेंज चालवण्यामागे आणखी काही कारण आहे का याचा तपास आता दहशतवाद विरोधी पथक करत आहे.