पुणे-औरंगाबाद रस्ता हस्तांतरण प्रक्रिया रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:12 AM2021-05-19T04:12:15+5:302021-05-19T04:12:15+5:30
महामार्गावरील वाहतूककोंडी कधी सुटणार : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग केल्याची केली होती घोषणा भाग - १ पुणे : राज्य ...
महामार्गावरील वाहतूककोंडी कधी सुटणार : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग केल्याची केली होती घोषणा
भाग - १
पुणे : राज्य सरकारकडून २०१७ साली पुणे-औरंगाबाद महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (भारतमाला) वर्ग केल्याची घोषणा करण्यात आली होती. तसेच, रस्त्याला ५५३ (एफ) असा क्रमांकही देण्यात आला. मात्र, चार वर्षे होत आली तरी रस्त्याची हस्तांतरण प्रक्रियाच झाली नसल्याची माहिती समोर आले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. सध्या या रस्त्यावर खराडी बायपास ते शिक्रापूर या २५ किलोमीटरवर रस्ता रुंदीकरण सुरू आहे.
पुणे-अहमदनगर-औरंगाबाद असा २३५ किलोमीटर रस्ता हा आठ पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या रस्त्यावर आता यापुढे फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे काम करणार असल्याची माहिती देण्यात आली. यासाठी अहमदनगर येथे मध्यवर्ती कार्यालय देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकार आणि प्राधिकरण यांच्यात पुढील कार्यवाही करण्यासाठी बैठकच झाली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रखडल्याचे अधिकाऱ्यांनी ''लोकमत''ला सांगितले. त्यामुळे हा महामार्ग हस्तांतरण कधी होणार आणि प्रत्यक्ष काम केव्हा सुरू होणार, असा प्रश्न वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रामवाडी (चंदननगर) ते शिक्रापूर असा २५ किलोमीटरवर रस्तारुंदीकरण करण्यात येत आहे. राज्य शासनाने यासाठी ३ मे २०२० ला २१९ कोटी रुपये मंजूर करून काम सुरू देखील झाले आहे. या कामासाठी २ मे २०२२ पर्यंतची म्हणजे एकूण दोन वर्षांची मुदत दिली आहे. मात्र लोणीकंद, तुळापूर फाटा, पेरणे फाटा, कोरेगाव भीमा, सणसवाडी आणि शिक्रापूर येथील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने काढून दिलेले नाही. त्यामुळे पुढील एक वर्षात अतिक्रमण काढणार का आणि रस्त्याचे काम पूर्ण होणार का, असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.
कोट
आम्ही एकूण २५ किलोमीटरचे काम करत आहोत. मात्र, प्रशासनाने आम्हाला ठिकठिकाणचे अतिक्रमण काढून दिलेले नाही. तसेच, रस्त्याचा अंतिम आराखडा तयार झालेला नाही. त्यामुळे आम्हाला काम वेगाने करण्यास अडचणी येत आहेत. जेथे परवानगी मिळाली आहे, तेथे काम सुरू केले आहे. काही स्थानिक लोक कामगारांना दमबाजी करत असल्याने देखील अडचणी येत आहेत.
- सोपान बेल्हेकर, ठेकेदार