...तरचं सर्वसामान्यांचं भलं होईल; नाना पाटेकरांचा राजकीय नेत्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 05:51 PM2022-02-20T17:51:27+5:302022-02-20T17:51:38+5:30
सोहळ्याला उपस्थित राजकीय नेत्यांना नाना पाटेकरांनी सल्ला दिला आहे
पुणे : शिवजयंतीनिमित्त बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. हा सोहळा अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पुण्यातील खासदार, आमदार आणि इतर राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर यांनी उपस्थित राजकीय नेत्यांना सल्ला दिला आहे. राजकारणातील सर्व चांगली माणसे एकत्र आली तर सर्वसामान्यांचे भले होईल असं त्यांनी सांगितलं आहे.
पाटेकर म्हणाले, राजकारणातील सर्व चांगली माणसे एकत्र आली तर सर्वसामान्यांचे भले होईल. पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात येणाऱ्याला पाच वर्षे कोणतेही पद देऊ नये म्हणजे कोणीच पक्ष बदलणार नाही. मृत्यूला तळहातावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जगविले आहे. या आपल्या राजाचा सन्मान करायचा असेल तर तशी वृत्ती बनवा असं ते म्हणाले आहेत.
शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करा
''छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करणे सोपे आहे. परंतु त्यांच्या विचाराचे अनुकरण करून त्यांच्या विचारसरणीप्रमाणे एक पाऊल जरी पुढे टाकता आले तर स्मारकाचे सार्थक झाले. हेच विचार घेऊन सर्वांना एकत्र करून सर्वांना अभिमान वाटावे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बाणेर तयार केले आहे असे कौतुकही त्यांनी यावेळी केले आहे.''
प्रेमाने मिठी मारल्यास सर्व द्वेष दूर होतील
''सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना एकत्र करून महाराजांनी स्वराज्य स्थापले, त्यामुळेच त्यावेळी कोणी असमाधानी नव्हता. इतिहासाच्या नावाखाली कोणी विकृती पेरू नये, ज्या दिवशी माणूस म्हणून एकमेकांना आपण ओळखू त्या दिवशी या स्मारकाचा सन्मान झालेला असेल. एकमेकांना प्रेमाने मिठी मारल्यास सर्व द्वेष दूर होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.''