'तुम्ही फकीर असलं पाहिजे; आम्ही जे झोळीत टाकू ते खायचं', नाना पाटेकरांनी नेत्यांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 05:30 PM2022-02-20T17:30:25+5:302022-02-20T17:30:42+5:30
शिवजयंतीनिमित्त बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात नाना पाटेकर बोलत होते
पुणे : शिवजयंतीनिमित्त बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. हा सोहळा अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पुण्यातील खासदार, आमदार आणि इतर राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर यांनी उपस्थित राजकीय नेत्यांना कडक शब्दात सुनावलं आहे. ''आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे म्हटल्यावर तुमची जबाबदारी आहे. तुम्ही फकीर असलं पाहिजे. आम्ही जे झोळीत टाकू ते खायचं,” असं नाना पाटेकरांनी यावेळी मंचावर उपस्थित नेत्यांना सांगितलं आहे''
यावेळी खासदार गिरीश बापट, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर आणि राजकीय नेते उपस्थित होते.
पाटेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला निवडून देतो म्हणजेच पाच वर्ष तुम्ही आमच्या गोष्टी केल्याच पाहिजेत. तुमचे कपडे मळलेले पाहिजेत. हातात भाकरीचा तुकडा ठेवला तर तो गिळायची सवय पाहिजे. निवडणुकीला उभे राहा म्हणून आम्ही गुळ, खोबरं दिलं होतं का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे म्हटल्यावर तुमची जबाबदारी आहे. सातबाऱ्यावर जमिनी नाही, तर माणसं वाढली पाहिजेत असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
प्रेमाने मिठी मारल्यास सर्व द्वेष दूर होतील
''सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना एकत्र करून महाराजांनी स्वराज्य स्थापले, त्यामुळेच त्यावेळी कोणी असमाधानी नव्हता. इतिहासाच्या नावाखाली कोणी विकृती पेरू नये, ज्या दिवशी माणूस म्हणून एकमेकांना आपण ओळखू त्या दिवशी या स्मारकाचा सन्मान झालेला असेल. एकमेकांना प्रेमाने मिठी मारल्यास सर्व द्वेष दूर होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.''