पुण्यात दहीहंडीसह गणेशाेत्सवात लेसर वापरास बंदी; पोलिसांचा आदेश भंग केल्यास कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 03:20 PM2024-08-26T15:20:57+5:302024-08-26T15:21:23+5:30
गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत लेसर दिव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता, त्यामुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या घटना घडल्या होत्या
पुणे : डोळे दिपवणाऱ्या लेसर प्रकाशझोतांवर विसर्जन मिरवणुकीत बंदी घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले. सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पुढील साठ दिवस शहर परिसरात लेसर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले.
लोहगाव परिसरात हवाईदलाचा तळ आहे, तसेच नागरी विमानतळ आहे. लेसर दिव्यांमुळे वैमानिकांचे डोळे दिपून अपघात होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून नियमित आदेश काढण्यात येत असतात. आदेशाची अंमलबजावणी शनिवारपासूनच (दि. २४) सुरू झाली आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे शर्मा यांनी आदेशात नमूद केले आहे.
गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत लेसर दिव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. लेसर दिव्यांमुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक पोलिस मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विसर्जन मिरवणुकीत लेसर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले होते.
यंदाचा दहीहंडी उत्सव लेसरमुक्त
दहीहंडी उत्सव मंगळवारी (दि. २७) आहे. दहीहंडीत विविध मंडळांकडून लेसर दिव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी लेसर दिव्यांवर बंदी घालण्याचे आदेश शनिवारी रात्री दिले. पुढील साठ दिवस शहरात लेसर दिव्यांचा वापर करण्यास बंदी राहणार आहे. त्यानंतर पोलिसांकडून सुधारित आदेश काढण्यात येणार आहेत.