महिला वकिलावर हल्ला करणाऱ्यांचे वकीलपत्र न घेण्याचा बार असाेसिएशनचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 03:50 PM2018-06-09T15:50:56+5:302018-06-09T15:50:56+5:30
अॅड नेहा जाधव यांच्यावर काेयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या अाराेपींचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव पुणे जिल्हा बार असाेसिएशकडून एकमताने मंजूर करण्यात अाला अाहे.
पुणे- महिला वकिलावर डेक्कन येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा पुणे जिल्हा बार असाेसिएशनच्या वतीने निषेध नाेंदविण्यात अाला असून अाराेपींचे वकीलपत्र काेणीही न घेण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात अाला अाहे. शुक्रवारी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत वकिलांनी हा निषेध नाेंदविला.
जमिनीच्या वादातून अजित गणपत गोगावले (वय ४५, रा़ मांजरी, हडपसर) आणि अमित अरुण वाल्हेकर (वय ३१, रा़ गणराज कॉलनी, काळेवाडी) यांनी अॅड नेहा नितीन जाधव अाणि बांधकाम व्यावसायिक कृष्णा ऊर्फ बापू तुकाराम शेटे यांच्यावर काेयत्याने प्राणघातक हल्ला केला हाेता. या हल्ल्यात अॅड नेहा जाधव या गंभीर जखमी झाल्या अाहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु अाहेत. अॅड नेहा जाधव या पुणे जिल्हा बार असाेसिएशच्या सभासद अाहेत. या प्रकरणी अाराेपींना पाेलीसांनी अटक केली अाहे.
नेहा जाधव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पुणे जिल्हा बार असाेसिएशनकडून शुक्रवारी निषेध नाेंदविण्यात अाला. यावेळी पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, उपाध्यक्ष ऍड. भूपेंद्र गोसावी, रेखा करंडे, सचिव ऍड. संतोष शितोळे, ऍड. लक्ष्मण घुले, खजिनदार ऍड. प्रताप मोरे, हिशेब तपासणीस ऍड. सुदाम मुरकुटे, कार्यकारिणी सदस्य ऍड. रमेश राठोड, ऍड. लक्ष्मी माने, ऍड. पंजाबराव जाधव, ऍड. योगेश पवार यांच्यासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. या सभेत महिला वकिलावर हल्ला करणाऱ्या दोघांचे वकील पत्र न घेण्याचा ठरात एकमताने मंजुर झाला आहे.