पुणे-बारामती डेमू वेळेवर सोडा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 18:31 IST2025-03-16T18:30:40+5:302025-03-16T18:31:32+5:30
दौंड येथून पुण्याला येण्यासाठी दुपारी तीन वाजता डेमू सुटते. पण, या गाडीला एक्स्प्रेस गाड्या सोडण्यासाठी सतत बाजूला उभे केले जाते.

पुणे-बारामती डेमू वेळेवर सोडा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
-अंबादास गवंडी
पुणे :पुणे-बारामती डेमूला पुणे स्थानकावरून सुटण्यास वारंवार उशीर होत आहे. त्याचा फटका दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना होत आहे. डेमूचे वेळा न पाळल्या गेल्यास पुणे रेल्वे स्टेशनवरील रुळावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवासी ग्रुपकडून देण्यात आला आहे.
दौंड येथून पुण्याला येण्यासाठी दुपारी तीन वाजता डेमू सुटते. पण, या गाडीला एक्स्प्रेस गाड्या सोडण्यासाठी सतत बाजूला उभे केले जाते. त्यामुळे या गाडीला सतत अर्धा ते पाऊण तास उशीर होतो. ही गाडी पुण्यात आल्यानंतर ती परत पुण्याहून बारामतीला सोडली जाते. दौंडहून येण्यास या गाडीला उशीर झाल्यामुळे ती पुण्याहून बारामतीला उशिरा निघते. असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवासी ग्रुपकडून रेल्वे प्रशासनास यापूर्वीही निवेदन देण्यात आले होते. पण गाडीच्या वेळेत सुधारणा झालेली नाही.
पुणे-बारामती डेमूची सुटण्याची वेळ सायंकाळी सहा वाजून ४५ मिनिटांची आहे. पण ती उशिराने निघाल्यास तिला बारामतीला पोहोचण्यासाठी खूपच उशीर होतो. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या गाडीच्या वेळा न पाळल्यास पुणे स्टेशनवर रुळावर उतरून रेल्वे रोको आंदोलन आंदोलन केले जाईल, असा इशारा पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवासी ग्रुपकडून देण्यात आला आहे.
महिलांसाठी स्वतंत्र डबा जोडा
कोविडपूर्वी पुणे-बारामती डेमूला महिलांची छेडछाड होऊ नये, यासाठी स्वतंत्र डबा राखीव असायचा. शिवाय, या डब्यामध्ये महिला पोलिस कर्मचारी उपलब्ध असायचे. परंतु कोविडनंतर महिलांसाठी राखीव डबा जोडणे बंद केले आहे. तसेच महिला पोलिस कर्मचारी नसल्याने महिलांना यामधून प्रवास करताना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे स्वतंत्र डबा जोडण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
पुणे - बारामती डेमूमधून दररोज हजारो स्थानिक, नोकरदार, विद्यार्थी प्रवास करतात. परंतु एक्स्प्रेस गाड्यांना सोडण्यासाठी डेमूला वारंवार बाजूला करण्यात येते. यामुळे डेमूला उशीर होतो. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे डेमू वेळेवर सोडण्यात यावी. अन्यथा पुणे स्थानकावर आंदोलन करण्यात येईल. - सारिका भुजबळ, अध्यक्ष, पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवासी ग्रुप