एक कोटी गोऱ्या साहेबांना कर्ज देणारी पुणेकर 'आर्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 02:20 PM2022-06-03T14:20:00+5:302022-06-03T14:31:43+5:30
"इंग्लंडमधील स्टार्टअप प्रक्रिया भारतापेक्षा सोपी..."
-दिपक होमकर
पुणे : 'ज्या ब्रिटिशांनी भारतावर दीडशेपेक्षा अधिक वर्षे राज्य केले त्या इंग्लंडसह संपूर्ण युरोपातील एक कोटींपेक्षा अधिक लोकांना मी आत्तापर्यंत कर्ज दिले आहे. मात्र, यापुढे दहा कोटी युरोपियन व्यावसायिकांना कर्ज देण्याची माझी महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी मी आणि माझ्या टीमचे प्रयत्न सुरू असून, तो क्षण लवकरच येईल,' हा ठाम आत्मविश्वास आहे आर्या तावरे या तिशीतल्या युवतीचा.
युरोपमधील आर्थिक क्षेत्रातील ३० वर्षांखालील ३० प्रभावशाली व्यक्तींची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. त्यामध्ये पुण्याच्या आर्याचा समावेश झाला होता, तिच्याशी लंडनमध्ये संपर्क केल्यावर तिने तिच्या प्रवासानिमित्त 'लोकमत'शी संवाद साधला. यावेळी ती तिचा प्रवास, तिची महत्त्वाकांक्षा आणि पुढे असलेले चॅलेंजेस याविषयी भरभरून बोलली.
आर्या म्हणाली की, बारामतीतील काटेवाडी हे माझे मूळ गाव असले तरी माझे सारे शिक्षण पुण्यात अभिनव आणि वळसे-पाटील स्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बॉयसिसमध्ये झाले. महाविद्यालयात शिकत असताना माझा भाऊ लंडनमध्ये बीई सिव्हिल करत होता. त्यामुळे मला लंडनला येण्याची संधी मिळाली. लंडनचे सौंदर्य पाहून मी लंडनच्या प्रेमात पडले. आपल्याला इथेच राहायला मिळाले तर.. त्यापेक्षा इथेच आपण जॉब केला तर असे अनेक विचार डोक्यात आले.
भारतात आल्यावरही माझ्या डोक्यातून ते विचार जात नव्हते आणि मग ठरवून मी लंडनमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. वडील बांधकाम व्यावसायिक आहेत त्यामुळे छोट्या व मध्यम बांधकाम व्यावसायिकांसमोर अर्थकारणाच्या समस्या कशा असतात, हे मी पाहिले होते. वडिलांनीही त्या व्यवसायाचे बाळकडू अगदी कळत्या वयापासून दिले. लंडनला गेल्यावरही तेथील व्यावसायिकांच्या समस्या भारतातील व्यावसायिकांसारख्याच असल्याच्या मला जाणवल्या. त्या व्यावसायिकांना मदत करायची आणि त्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी कंपनी काढायचे ठरवले. शिकत असतानाच वयाच्या बाविसाव्या वर्षी मी लंडनमध्ये स्टार्टअप केला.
स्टार्टअप प्रक्रिया भारतापेक्षा सोपी
इंग्लंडमधील स्टार्टअप प्रक्रिया ही भारतातील प्रक्रियेपेक्षा सोपी आणि सुटसुटीत आहे. त्यामुळे इथे स्टार्टअप करताना प्रशासकीय अडचणी आल्याच नाहीत. भारतामध्ये माझा बिझनेस मी वाढविला नसला तरी भविष्यामध्ये त्याचे प्लॅनिंग आहे. सध्या युरोपियन देशांमध्ये व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न आहे. येत्या काही वर्षांत दहा कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. मेहनतीच्या जोरावर आम्ही ते साध्य करू, असा विश्वास आर्या तावरे यांनी व्यक्त केला.