अनुभवी, विश्वसार्ह डॉक्टरांमुळे पुणे बनतेय आयव्हीएफ हब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:43+5:302021-07-01T04:09:43+5:30
डॉक्टर डे विशेष प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये पालक होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी ‘इन व्हिट्रो फर्टिलायझेशन’ अर्थात ‘आयव्हीएफ’ ...
डॉक्टर डे विशेष
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये पालक होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी ‘इन व्हिट्रो फर्टिलायझेशन’ अर्थात ‘आयव्हीएफ’ उपचारपद्धती मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरत आहे. शहरातील ‘आयव्हीएफ’तज्ज्ञांचे कौशल्य आणि अनुभव, उपचारांमधील हातखंडा आणि उपचारपद्धती यशस्वी होण्याचे प्रमाण यामुळे पुणे आयव्हीएफ तंत्राचे महत्त्वाचे हब मानले जात आहे. पुण्यात ५५ हून अधिक आयव्हीएफ सेंटर आहेत.
कोरोनाकाळात डॉक्टर प्राणपणाने संकटाशी लढत आहेत. त्याचवेळी गर्भधारणेत येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि जोडप्यांची पालक होण्याची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी आयव्हीएफतज्ज्ञ प्रयत्नांची शर्थ करत आहेत. असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) या कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञानाच्या अंतर्गत वेगवेगळ्या उपचारपध्दती आणि प्रक्रिया आहेत. यामध्ये आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन), आयसीएसआय (इन्ट्रासायटोप्लासमिक स्पर्म इंजेक्शन), इंट्रा युटेरिन इन्सेमिनेशन (आययुआय) आदींचा समावेश आहे. पुण्यातील विविध आयव्हीएफ सेंटरमध्ये गरजेनुसार उपचारपद्धती ठरवून उपचार केले जात आहेत.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संतोष सिदिड म्हणाले, ‘नोबेल हॉस्पिटलमध्ये भारतातील रुग्णांप्रमाणेच मध्य पूर्व, तसेच युरोपीय देश आणि आशियाई देशांमधूनही रुग्ण येतात. एकूण रुग्णांच्या प्रमाणात त्यांची संख्या साधारण २० टक्के आहे. भारतातील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या उपचारांना येणारे यश, त्यांचा अनुभव यामुळे रुग्ण विश्वासाने येतात. परदेशातील रुग्ण येथे उपचारपद्धती यशस्वी होऊन गर्भधारणा झाल्यावर सोनोग्राफी करून प्रसूतीसाठी आपापल्या देशात जातात.’
आयव्हीएफ स्पेशलिस्ट डॉ. भारती ढोरे-पाटील म्हणाल्या, ‘पुणे वातावरण तसेच प्रवासाच्या दृष्टीने उत्तम शहर आहे. येथील उपचारांची पद्धत, विश्वासार्हता, पारदर्शकता, सक्सेस रेट, रुग्णांना डॉक्टरांकडून दिला जाणारा वेळ, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यामुळे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी साठी रुग्ण पुण्यात येतात. कोरोनाकाळात अनेक रुग्णांनी टेलिकॉलिंग, इंटरनेटच्या सहाय्याने डॉक्टरांशी संवाद साधला. मुंबई, दिल्लीच्या तुलनेत पुण्यातील उपचार आर्थिक दृष्टीने परवडणारे आहेत. पुण्यात पोस्ट ग्रॅज्युएट सर्टीफिकेट कोर्स इन असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीसारखे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.’
------
आयव्हीएफच्या एका सायकलचा खर्च इतर देशांमध्ये भारताच्या तुलनेत दहापट जास्त आहे. त्यातही पुण्यात जास्त संख्येने आयव्हीएफ सेंटर आहेत. इतर देशांमध्ये आयव्हीएफ सेंटरना शासनाचा निधी मिळतो. त्यामुळे आयव्हीएफसाठी परवानगी मिळण्यासाठी वेळ लागतो. भारतात सेल्फ फंडेड सेंटर आहेत. पुण्यातील आयव्हीएफ सेंटरमध्ये आठवड्याभरात अपॉइन्मेंट मिळू शकते. परदेशात तीन-सहा महिने लागू शकतात. इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शनचे (इसार) भारतात ४००० हून अधिक सदस्य, तर पुण्यात ५० सदस्य आहेत. इसारतर्फे नॅशनल बोर्डचा दोन वर्षांचा रिप्रोडकटिव्ह मेडिसिन एज्युकेशनचा अभ्यासक्रम आहे. एमडी (गायनॅक) झालेले साधारण २००० डॉक्टर परीक्षेला बसतात. महाराष्ट्रात ७-८ सीट आहेत. फॉगसीतर्फेही सहा महिन्यांचे फेलोशिप प्रोग्रॅम उपलब्ध आहेत.
- डॉ. सुनीता तांदूळवाडकर, उपाध्यक्ष, इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शन, पुणे शाखा
------
पुणे हे आयव्हीएफचे माहेरघर बनत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण पुण्यात येतात. परदेशात वास्तव्यास असलेले एनआरआय लोकही पुण्याला पसंती देतात. विश्वसार्हता, एथिकल प्राकटिस यामुळे रुग्णांचा येथील डॉक्टरांवर विश्वास आहे. काही देशांमध्ये कृत्रिम प्रजनन पद्धतीत डोनर मिळण्यासाठी बराच काळ लागतो. आपल्याकडे ही प्रक्रिया कमी वेळेत पूर्ण होते. येथील डॉक्टर अनुभवी आणि निष्णात असल्याने सक्सेस रेटही जास्त आहे.
- डॉ. माधुरी रॉय, आयव्हीएफ कन्सल्टंट