Pune: कर बुडवल्याप्रकरणी बीअर बनवणाऱ्या कंपनीला ५७ कोटींचा दणका; दोन संचालकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 11:05 AM2024-04-04T11:05:24+5:302024-04-04T11:05:52+5:30
तब्बल ५७ कोटी ४८ लाख ६९ हजार ४१५ रुपयांचा कर बुडवल्याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
पुणे : महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा २००२ ची प्रलंबित थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ब्रुक्राप्ट मायक्रो प्रायव्हेट लिमिटेड या बीअर बनवणाऱ्या व विकणाऱ्या कंपनीला राज्यकर विभागाने दणका दिला आहे. तब्बल ५७ कोटी ४८ लाख ६९ हजार ४१५ रुपयांचा कर बुडवल्याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुकेतु दत्तात्रय तळेकर (रा. वॉर्डन फ्लंट क्रमांक २०१, बांद्रा) आणि प्रतीक रघुनाथ चतुर्वेदी (रा. शारदानगर, रायबरेली रोड स्कीम, लखनऊ) यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राज्यकर निरीक्षक दीपक साहेबराव शिंदे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक शिंदे हे येरवडा येथील वस्तू व सेवाकर भवन येथे राज्यकर निरीक्षक या पदावर आहेत. कोणत्याही व्यापाऱ्याने कोणतीही मालाची विक्री केली असता त्या व्यापाऱ्याकडे कराची रक्कम वसूल करून ती शासनाच्या तिजोरीमध्ये जमा करायची असते. मात्र, ब्रुकाफ्ट मायक्रो ब्रुइंग ही कंपनी बीअर बनवणे व अन्न व बीअर विकणे अशा प्रकारचा व्यवसाय करते. ही कंपनी मोहंमदवाडी येथील कोरीअंथ बॅक्वेट हॉटेल येथे कार्यरत आहे. या कंपनीचे संचालक तळेकर आणि चतुर्वेदी यांनी मूल्यवर्धित कर कायदा २००२ च्या कलम २० अन्वये विवरणपत्रके दाखल करणे बंधनकारक आहे, हे त्यांना वारंवार सूचित केले होते. तसेच, कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.
त्यालाही योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने व तब्बल ५७ कोटी ४८ लाख ६९ हजार ४१५ हजारांचा कर चुकवल्याने कंपनीच्या दोन्ही संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे, राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, राज्यकर उपायुक्त सुधीर खेडकर, सहायक राज्यकर आयुक्त नीलम भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर निरीक्षक दीपक शिंदे यांच्या पथकाने केली.