पुणे : अध्यासनप्रमुखांच्या निवडीला अखेर सुरुवात, बंद कार्यालयांचे उघडणार कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:52 AM2018-01-23T06:52:45+5:302018-01-23T06:53:01+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्यासनांच्या गेल्या ३ वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांवर प्रमुखांची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली आहे. निवड झाल्याची पत्रे काहींना पाठविण्यात आली आहेत, मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्यासनांच्या गेल्या ३ वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांवर प्रमुखांची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली आहे. निवड झाल्याची पत्रे काहींना पाठविण्यात आली आहेत, मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एकूण १९ अध्यासने आहेत, त्यापैकी १७ अध्यासनांची प्रमुखपदे रिक्त होती. ही बंद अध्यासने सुरू व्हावीत, यासाठी ‘लोकमत’कडून पाठपुरावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अखेर प्रमुखांच्या निवडीला सुरुवात झाल्याने त्यांचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अध्यासनप्रमुखांच्या रिक्त पदांवरील नियुक्तीसाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. के. एच. संचेती, प्रा. सुहास पळशीकर, प्रा. राजा दीक्षित यांची शोध समिती स्थापन करण्यात आली होती. तीन अध्यासनांच्या प्रमुखांची नावे अंतिम झाली आहेत. संत नामदेव अध्यासनाच्या प्रमुखपदी सदानंद मोरे, संत तुकाराम अध्यासनाच्या प्रमुखपदी अभय टिळक, पद्मश्री विखे-पाटील अध्यासनाच्या प्रमुखपदी डॉ. मुकुंद तापकीर यांची नावे निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अध्यासनांवर प्रमुख म्हणून काम करण्यासाठी काही जणांनी स्वत:हून अर्ज केले होते. शोध समितीने काही तज्ज्ञांशी संपर्क साधून या अध्यासनांवर काम करण्याविषयी विचारणा केली आहे. त्यानुसार अध्यासनांवरील प्रमुखांची नावे अंतिम केली जात आहेत. यामुळे अध्यासनांचे बंद असलेले काम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यापीठाकडून महापुरुष, समाजसुधारक, कलावंत यांच्या नावाने अध्यासने सुरू करण्यात आली. अध्यासनांच्या माध्यमातून त्यांचे विचार व कार्यांवर संशोधन व्हावे, तसेच सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक आदी विषयांवर अध्यासनांनी चर्चा घडवून आणावी, असा यामागचा हेतू आहे; मात्र तीन वर्षांपासून अध्यासनप्रमुखांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व छत्रपती शिवाजी अध्यासन वगळता १७ अध्यासनांची प्रमुख पदे रिक्त आहेत. त्यामुळे या अध्यासनांचे सर्व कामकाजच थंडावले आहे.