राहण्यासाठी उत्तम शहराचा दर्जा म्हणजे मूर्ख बनविण्याचा प्रकार; सर्वसामान्यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 07:30 PM2018-09-02T19:30:59+5:302018-09-02T20:46:10+5:30
पुणे शहराला देशातील राहण्यासाठी सर्वाेत्कृष्ट शहराचा दर्जा देणे म्हणजे नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रकार असल्याचे मत सर्वसामान्यांनी सजग नागरिक मंचच्या चर्चासत्रात व्यक्त केले.
पुणे: वाहतुक, प्रदुषण, कचरा आणि आरोग्या सारख्या सुविधांमध्ये पुणे शहरासारखी वाईट स्थिती इतर कोणाचीही नसेल, असे असताना पुणे शहराला जगण्यासाठी देशात सर्वोत्कृष्ट शहराचा दर्जा देण्यात आला आहे. हा जो कोणी सर्व्हे केला नक्की कोणाच्या फायद्यासाठी व कुणाच्या सांगण्यावरून केला हा मोठा संशोधनाचा विषय आहे. परंतु हा प्रकार म्हणजे नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रकार असल्याचे मत सजग नागरिक मंचच्या चर्चासत्रात सर्वसामान्य पुणेकरांनी व्यक्त केले.
सजग नागरिक मंचच्या मासिक चर्चासत्रात ‘पुणे शहर सर्वोत्कृष्ट शहर जाणवतेय का?’ या विषयावर नागरिकांचा खुला संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, कार्यकारी विश्वस्त जुगल राठी यांच्यासह अनेक अभ्यासू सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी वेलणकर यांनी सांगितले की, वाहतुक, प्रदुषण, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य अशा विविध २५ मुद्द्यांवर सर्व्हे करून पुणे शहर जगण्यासाठी देशात सर्वोत्कृष्ट शहर असल्याचे नुकतेच जाहीर केले. देशातील १११ शहरामध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये पुणे प्रथम क्रमांकाचे शहर असल्याचे म्हटले ही अत्यंत केविलवाणी बाब आहे. प्रदुषण आणि घनकचरा मध्ये पुण्यासारखी वाईट स्थिती इतर कोणत्याही शहराची नसेल असे त्यांनी सांगितले. तर जुगल राठी यांनी सध्या पुणे शहरात पदाचा-यांची परिस्थिती प्रचंड केविलवाणी आहे, कोट्यवधी रुपये खर्च करुन फुटपाथ बांधण्यात आले पण त्यावर चालण्यासाठी जागा नसते, सायकल ट्रॅकची स्थिती तिच, सलग एक किलो मिटर सायकल चालू शकतो असा एकही ट्रॅक नाही, अनेक सायकल ट्रॅक गायब झालेत, तर सर्वाजनिक वाहतुक आणि वाहतुक कोंडीची समस्या यावर न बोललेच बर असे असताना या सर्व्हेक्षणामध्ये पुणे शहराला ५ पैकी ४.२ इतके गुण मिळतात हे हस्यास्पदच असल्याचे राठी यांनी येथे सांगितले.
तर कच-यामध्ये काम करणा-या जर्नल जठार यांनी २४ तासात खत करणारे शहरात सुरु झालेले ११ प्रकल्प हा एक अद्भूत प्रकारच म्हणावे लागेल. प्रकल्प सुरु करताना देण्यात येणारी टिपींग फी हा मोठा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे. शहरातील सध्याची कच-याची भयानक स्थिती लक्षात घेता यामध्ये देखील पुण्याला ९२ टक्के गुण कसे मिळाले हा मोठा प्रश्नच असल्याचे त्यांनी सांगितले. हीच परिस्थिती आरोग्याच्या सुविधाचा आहे. शहरात सर्वाजनिक आरोग्याची परिस्थिती प्रचंड गंभीर आहे. त्यामुळे पुणे शहराला सर्वात्कृष्ट शहर म्हणून जाहीर करणे म्हणजे पुणेकरांना मुर्ख बनविण्याचाच प्रकार असल्याचे मत येथे व्यक्त करण्यात आले.