मासे पकडायला गेलेल्या तरुणाचा नदीपात्रात सापडला मृतदेह; दोन दिवसांपासून होता बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 14:35 IST2024-07-27T13:09:49+5:302024-07-27T14:35:43+5:30
पुण्यात आंबील ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला आहे.

मासे पकडायला गेलेल्या तरुणाचा नदीपात्रात सापडला मृतदेह; दोन दिवसांपासून होता बेपत्ता
संतोष गाजरे
कात्रज : कात्रज परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना व नाल्यांना पूर आला आहे. अशातच कात्रज येथील लेक टाऊन शेजारी असणाऱ्या आंबील ओढ्यातील ड्रेनेज लाईन मधून एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक प्रकार घडला होता. पुण्यात एकीकडे पूरसदृश्य परिस्थिती असताना गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली होती. त्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनी अग्निशमन दलाच्या हाती लागला आहे. नदीपात्रात या तरुणाचा मृतदेह सापडला आहे.
अक्षय संदेश साळुंखे (वय २६) राहणार शिवमुद्रा चाळ अप्पर असे मृत तरुणाचे नाव आहे. अक्षय हा मासे पकडण्यासाठी आंबील ओढ्यात गेला होता. मात्र आंबील ओढ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे अक्षय वाहून गेला आणि ही दुर्घटना घडली. भारती विद्यापीठ पोलीस कात्रज, गंगाधाम, जनता वसाहत आणि कसबा अग्निशामक दलाच्या जवानांकडून अक्षयचा दोन दिवसांपासून शोध सुरु होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास दहा ते बारा चेंबरमध्ये अक्षयचा शोध घेतला. रात्री देखील जवानांचे शोधकार्य सुरु होते. अखेर डेंगळे पूलाजवळ कुंभार वाडा आणि संगम पुलाच्या येथे अक्षयचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पुढील तपासणी साठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
कात्रज, गंगाधाम, जनता वसाहत,कसबा अग्निशमन दलाकडून अक्षयचा दोन दिवसांपासून शोध घेण्यात येत होता. अग्निशमन अधिकारी सुनील नाईकनवरे,प्रदीप खेडेकर,सुभाष जाधव, तांडेल भरत भारती,भरत वाडकर,फायरमन तेजस मांडवकर,अनिकत पवार,गव्हाळी,येरफुले,अविनाश जाधव,प्रतीक शिर्के,रोहित जाधव व इतर पंधरा ते वीस जणांनी हे शोधकार्य केले.