Breaking : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार निष्पाप काळवीट ठार; कात्रज प्राणिसंग्रहालयात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 08:49 AM2021-01-07T08:49:12+5:302021-01-07T09:25:29+5:30

राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील काळविटांच्या खंदकात पाच भटकी कुत्री घुसली होती.

Pune Breaking: Four innocent blackbuck killed in attack by street dogs; shocking incidents of Katraj Zoo park | Breaking : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार निष्पाप काळवीट ठार; कात्रज प्राणिसंग्रहालयात खळबळ

Breaking : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार निष्पाप काळवीट ठार; कात्रज प्राणिसंग्रहालयात खळबळ

googlenewsNext
ठळक मुद्देभिंत पडलेल्या ठिकाणाहून आत घुसल्याचा अंदाज 

श्रीकिशन काळे- 

पुणे : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पाच भटकी कुत्री काळवीटांच्या खंदकात घुसली. त्यांनी तेथील चार काळवीटांवर केेलेल्या  हल्ल्यात निष्पाप काळविटांचा मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवारी पहाटे निदर्शनास आला आहे. ही कुत्री तुटलेल्या भिंतीमधून आल्याचा अंदाज आहे. चार कुत्र्यांना पकडण्यात यश आले आहे. 

प्राणीसंग्रहालयात सकाळी कर्मचारी फिरत असताना त्यांना चार काळवीट मेलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर आजुबाजूला शोध घेतल्यावर कुत्री असल्याचे दिसले. कर्मचाऱ्यांनी लगेच त्या कुत्र्यांना पकडले. पाच पैकी चार कुत्र्यांना पकडण्यात यश आले. पण एक कुत्रा इतरत्र पळून गेला.

सीसीटीव्हीच्या मदतीने या कुत्र्याचा शोध घेण्यात येत आहे. जर हा कुत्रा हरणांच्या खंदकात गेला, तर अजून मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे त्यांना पकडण्याचे काम सुरू आहे. 

बिबट्याच्या खंदकाशेजारी काळवीटांचे खंदक आहे. त्या खंदकापलीकडे कात्रज तलाव आहे. गेल्या वर्षी (२५ सप्टेंबर २०१९) खूप पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तेव्हा पाण्याला वाट करून देण्यासाठी प्राणीसंग्रहालयाची भिंत तोडली होती. ती भिंत पुर्णपणे बांधली गेली नाही. म्हणून त्या भिंतीमधूनच ही कुत्री आत आली असतील, असा अंदाज आहे. 

-----------------------------------------------

कायद्याने काळवीटाला मिळालेय संरक्षण 

काळवीट हे हरीण प्रामुख्याने भारतात आढळून येते. हे हरिणांच्या कुरंग कुळातील प्रमुख हरीण आहे. नर काळवीट हा काळ्या रंगाचा असून, मादी ही भुऱ्या रंगाची असते. नरांना प्रामुख्याने शिंगे असतात. माद्यांना शिंगे नसतात. ही काळवीट खूूूप घाबरट असतात. यांची शिकार करता येत नाही. सरकारने यांना शेड्युल्ड १ मध्ये समाविष्ट केले असून, संकटग्रस्त असा हा प्राणी आहे.

------------------------

आज सकाळी कुत्र्यांनी आत प्रवेश करून काळवीटांना चावा घेतला आहे. त्यात चार काळवीट मरण पावली आहेत. आम्ही सीसीटीव्ही पाहिला, त्यात कुत्री दिसली. चार कुत्र्यांना पकडून भुल देऊन प्राणीसंग्रहालयाबाहेर लांब सोडले आहे. नाल्याशेजारी सीमा भिंत आहे. तेथून ते आल्याचा अंदाज आहे. तेथील भिंत त्वरीत बांधण्याचा आदेश दिला आहे. या घटनेचा अहवालही मागविला आहे. 

- कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका पुणे

--------

 

Web Title: Pune Breaking: Four innocent blackbuck killed in attack by street dogs; shocking incidents of Katraj Zoo park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.