ST strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पुणे बस असोसिएशनचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 01:46 PM2021-11-11T13:46:59+5:302021-11-11T17:17:24+5:30
जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप सुरू राहिल अशी भूमिका पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे
पुणे: सध्या राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचा समावेश करावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच पुणे बस असोसिएशनने या बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नाही म्हणून पुणे बस असोसिएशनने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला आहे. परिवहनला दिलेल्या खाजगी बसेसची बुधवारी राज्यभरात अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे. जोपर्यंत सरकार सुरक्षेची हमी देत नाही तोपर्यंत खाजगी बस बंद राहतील असा पवित्रा खाजगी बस संघटनेचे कार्याध्यक्ष बाबा शिंदे यांनी घेतला आहे.
कोल्हापुरात खाजगी बसेसच्या काचा फोडण्यात आल्या तसेच वाहकालाही मारहाण करण्यात आली आहे. पुण्यात प्रवाशांनी भरलेल्या बसेस रिकाम्या केल्या. प्रशासनाकडून कोणतंही सहकार्य मिळत नसल्याने खाजगी बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर या पद्धतीने खाजगी बसेसचे नुकसान होत असल्याने आम्ही बस थाबवण्याच निर्णय घेत संपाला पाठिंबा दिल्याची माहिती बस संघटनेचे कार्याध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली. तसेच दुपारी परिवहन मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, ही माहिती पुणे बस असोशिएशनने दिली.
जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप सुरू राहिल अशी भूमिका पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आज सलग चौथ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत, हा लढा सुरु ठेवणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.