दीड महिन्याच्या प्रचारानंतर पुण्यातील उमेदवार रिलॅक्स; १ दिवस कुटुंबासोबत अन् कार्यालयातही हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 02:31 PM2024-05-15T14:31:03+5:302024-05-15T14:32:49+5:30
धंगेकरांनी शेतीत मारला फेरफटका, मोहोळांनी कुटुंबासोबत पाहिला सिनेमा तर मोरेंनी दिला श्वानांना वेळ
निलेश राऊत
पुणे: मतदारांच्या भेटी-गाठी, पदयात्रा, बाईक रॅली, सभा, मॉर्निंग वॉक यापासून रात्रीच्या वेळी कार्यकर्त्यांशी चर्चा, प्रचाराचे नियोजन यात गेला दीड महिना व्यस्त असलेले लोकसभेच्या रिंगणातील उमेदवार मतदान झाल्यावर साेमवारी (दि. १३) रात्री १० नंतर रिलॅक्स झालेले पाहायला मिळाले. प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून बहुतांश उमेदवारांनी आपला वेळ कुटुंबाला दिला. दुसऱ्या दिवशी आराम करण्याला प्राधान्य दिले.
पुणे लोकसभेची निवडणूक महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्यावर केंद्रित होती. या तीनही उमेदवारांनी दिवसाची रात्र करून आपला प्रचार केला. या दीड महिन्यात या उमेदवारांना स्वत:साठी वेळ नव्हता. उमेदवार स्वत:च काय पण त्यांचे कुटुंबीयदेखील प्रचार यंत्रणेत दिवस रात्र व्यस्त होते. आता कुठे त्यांना उसंत मिळाली आहे.
१. दोन दिवस आराम करून कोकणात जाणार
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी निवडणुकीतून विश्रांती मिळाल्यानंतर मंगळवारी आपल्या आवडत्या श्वानांना वेळ दिला. निवडणुकीच्या सर्व धामधुमीत माझी ही सर्व गॅंग (श्वान) माझ्या प्रेमापासून वंचित राहिली होती, म्हणून मंगळवारी सकाळपासून त्यांना वेळ दिला. यात मला मोठा आनंद झाला, असे वसंत माेरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आता निकालाची प्रतीक्षा असली तरी त्याला मोठा अवधी आहे. मतदान झाल्यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी नेहमीप्रमाणे श्वानांना खायला घालायला रात्री गेलाे. पुढील दोन दिवस घरी आराम करून, नंतर कुटुंबासोबत कोकणात जाणार आहे, असेही माेरे म्हणाले.
२. राेजची कामे करून शेतीत मारला फेरफटका
दीड महिना प्रचारात गेले असले तरी माझी नित्याची कामे आजही सुरू आहेत. लोकसभेचा उमेदवार असलो तरी मी विद्यमान आमदार आहे, त्यामुळे मंगळवारी (दि. १४) देखील मी नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता माझ्या संपर्क कार्यालयात गेलो होतो. नागरिकांना लागणारी पत्र दिली, कार्यकर्त्यांशी संवाद साधून दुपारी माझ्या नाथाची वाडी (ता. दौंड) या गावी आलो. सायंकाळी पुन्हा पुण्यात येऊन दत्तवाडी येथील म्हसोबा उत्सवास हजेरी लावली. कार्यकर्त्यांना, नागरिकांना वेळ देणे यालाच प्राधान्य देणार आहे. कुटुंबासोबत कुठे बाहेर जाण्याचे अजून काही ठरवले नाही.
आजचा दिवस आरामाचा, मुलींसोबत सिनेमा पाहण्याचा ...
३. मतदान झाल्यावर रात्री उशिरापर्यंत प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून दिवसभराचा आढावा घेतला. आज (दि.१४) दिवसभर घरात बसून आराम तर केलाच, पण मुलींसोबत सकाळी आर्टिकल ३७० सिनेमा टीव्हीवर पाहिला. दरम्यान, दिवसभर अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महायुतीतील सहकारी पक्षाचे पदाधिकारी यांना फोन करून सर्वांचे धन्यवाद मानले असल्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. येत्या २० मे ला मुंबईतील विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. भाजपचा राज्याचा सरचिटणीस या नात्याने व पक्षाच्या सूचनेनुसार मुंबईतील एखाद्या मतदारसंघात मी जाणार आहे. पक्षाचे काम महत्त्वाचे आहे, त्यानंतर पुढील नियोजन राहील. पुणे लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत गेल्यावर्षीपेक्षा अधिकचे मतदान झाले असून, हे आमच्यासाठी चांगले संकेत आहेत. वाढलेले मतदान हे भाजपचा, महायुतीचा विजय निश्चित करून गेला असल्याचा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.