Omicron: ओमायक्रॉनचा सामना करण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 03:42 PM2021-12-25T15:42:25+5:302021-12-25T16:14:49+5:30
रुग्णालयात सध्या ४ मोठी ऑक्सिजन जनरेटर प्लान्टस ऍक्टिव्ह आहेत त्यात एक लिक्विड ऑक्सिजन प्लांट आहे...
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड (Omicron Pune Cantonment Board) हद्दीत चार रुग्णांचे ओमायक्रॉन करोना विषाणू अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने काल जाहीर करत कॅन्टोन्मेंटला कळवले होते. त्यानंतर लगेचच रात्रीच्या रात्री ओमायक्रॉन विषाणूसाठी पटेल रुग्णालयाने विशेष १५ बेडचे आयसोलेशन विभाग तयार करून ठेवले असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा तपासे यांनी दिली.
पंधरा दिवसांपूर्वी कॅम्प भागातील एक नागरिक दुबईहून प्रवास करीत पुण्यात आला होता. त्यानंतर त्याची ओमायक्रॉन करोना तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याने लगेचच त्याच्या कुटुंबातील एक लहान मूल व दोन स्त्रियांची तपासणी करून घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना या विषाणूची अतिशय सौम्य लागण झाली असून त्यांच्या घराच्या विलागीकरणालाही १२ दिवस होऊन गेली असून सर्वांची तब्येत उत्तम आहे. सर्वांनी करोनाप्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत. यातील ३ जण सध्या भवानी पेठेत घरीच विलागीकरणात आहेत तर केवळ एक नागरिक कॅम्प भागातील घरात विलागीकरणात आहेत.
याबाबतची माहिती काल राज्याच्या आरोग्य विभागाने कॅन्टोन्मेंट बोर्डाला देताच पटेल रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. प्रकाश भोसले यांच्या नेतृत्वाखाली १ डॉक्टर, ३ नर्स, रुग्णवाहिका अशी एक टीम रुग्ण राहत असलेल्या ठिकाणी तपासणीसाठी गेले. रुग्ण आणि त्याचा संपर्कात असलेल्या नागरिकांची शोध व तपासणी करण्याचे काम सुरू असून आवश्यक त्या ठिकाणी स्वाब देखील घेतले जातील. तसेच हे रुग्ण ज्या सोसायटीत राहतात त्यात ६० फ्लॅट आहेत त्या सर्वांची आर टी पी सी आर टेस्ट पोलीस बंदोबस्तात करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली.
पटेल रुग्णालय ओमायक्रोनचा सामना करण्यासाठी सज्ज-
कॅन्टोन्मेंटमध्ये आढळलेल्या ओमायक्रोन रुग्णाबाबत विचारले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. तपासे म्हणाले, सध्या आढलेल्या रुग्णांमध्ये ओमायक्रोनची सौम्य लक्षण आहेत. आम्ही सध्या ओमायक्रॉनसाठी १५ बेडचे विलागीकरण कक्ष काल रात्रीच तयार केले असून, आवश्यकता भासल्यास रुग्णालयाचा १२० बेडचा जनरल वॉर्ड देखील आम्ही रुग्णांसाठी परिवर्तित करून सध्या १० बेड चे अतिदक्षता विभाग करोना रुग्णांसाठी सुरू आहे, गरज भासल्यास आणखी १० म्हणजे एकूण २० अतिदक्षता विभागाचे बेड आमच्याकडे तयार आहेत.
रुग्णालयात सध्या ४ मोठी ऑक्सिजन जनरेटर प्लान्टस ऍक्टिव्ह आहेत त्यात एक लिक्विड ऑक्सिजन प्लांट आहे. सध्या ऑक्सिजन निर्मिती क्षमता एवढी आहे की इतर रुग्णालयाला देखील पटेल रुग्णालय ऑक्सिजन पुरवठा करू शकतो, आमच्या सर्व वैद्यकीय व अवैद्यकीय कर्मचाऱ्याने अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड ओमीक्रीन चा समान करण्यासाठी तयार आहे, असंही डॉ. तपासे म्हणाले.