Pune Cantonment Board: पुणे कॅन्टोन्मेंटची भरती रद्द; आता आम्ही करायचे काय? उमेदवारांचा सवाल

By श्रीकिशन काळे | Published: March 18, 2023 04:50 PM2023-03-18T16:50:35+5:302023-03-18T16:51:22+5:30

अर्जासाेबत भरलेल्या शुल्काचे काय? उमेदवारांचा सवाल...

Pune Cantonment Recruitment Cancelled; What do we do now? Question of candidates | Pune Cantonment Board: पुणे कॅन्टोन्मेंटची भरती रद्द; आता आम्ही करायचे काय? उमेदवारांचा सवाल

Pune Cantonment Board: पुणे कॅन्टोन्मेंटची भरती रद्द; आता आम्ही करायचे काय? उमेदवारांचा सवाल

googlenewsNext

पुणे : देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डामधील विविध पदांसाठीच्या जागांची भरती नुकतीच जाहीर झाली होती. परंतु, संरक्षण विभागाने ती भरती स्थगित करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे हजारो उमेदवारांनी अर्ज भरूनही त्यांना आता नोकरी मिळणार नाही. तसेच त्यांनी अर्जासोबत भरलेल्या शुल्काचे काय? असा प्रश्नही उमेदवारांकडून विचारला जात आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी बोर्ड व देशातील अनेक बोर्डामध्ये भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संकेतस्थळावर आणि एम्प्लॉयमेंटमध्येही जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर हजारो उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरून शुल्क दिले होते. त्यांना अर्ज भरल्याची पावतीदेखील मिळाली होती. त्यामुळे मुलाखत कधी होऊन हातात नोकरीचे पत्र मिळेल, या आशेवर अनेकजण बसले होते; पण अचानक संरक्षण विभागाकडून भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश आला आणि सर्व उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. सर्वांची निराशा झाली असून, आता शुल्क भरलेले परत तरी मिळणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या विषयी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून केवळ भरती प्रक्रिया रद्दचा आदेश आल्याचे सांगण्यात आले. उमेदवारांनी जो अर्ज भरला, त्याचे शुल्क भरले त्याविषयी बोर्डाकडे अद्याप काहीच सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे या उमेदवारांना आता वाली कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे.

या जागांसाठी होती भरती

बोर्डामधील संगणक प्रोग्रामर, सुपरिटेंन्डंट, फायर ब्रिगेड सुपरिटेंन्डंट, ज्युनिअर क्लार्क, ड्रायव्हर, लॅब अटेंडन्ट प्यून, स्टोअर अटेंन्डंट, असिस्टंट मेडिकल ऑफिसर, आया, फिटर, माळी, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, मजदूर, डीएड शिक्षक, हिंदी टायपिस्ट आदी जागांसाठी ही भरती होती.

शुल्काचे काय करणार ?

भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. त्यासाठी ४०० व ६०० असे शुल्क त्यासाठी आकारण्यात आले होते. त्यामुळे ज्यांनी हे शुल्क भरले आहे, त्यांना ते परत मिळणार आहेे का ? असा सवाल केला जात आहे. ही भरती भविष्यात होणार असेल, तर आता भरलेले अर्ज ग्राह्य धरले जातील का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

कॅन्टोन्मेंट भरती प्रक्रिया रद्द झाली. तसेच निवडणूकदेखील होणार नाही. बोर्डाचा आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्यामुळे हा निर्णय झाला आहे. आता एकूणच बोर्डाचे काय होणार, याविषयी काहीच सांगता येत नाही.

- विकास भांबुर्डे, सामाजिक कार्यकर्ते, पुणे कॅन्टोन्मेंट परिसर.

Web Title: Pune Cantonment Recruitment Cancelled; What do we do now? Question of candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.