स्पर्धेचे ‘पुणे’ केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:13 AM2021-09-09T04:13:52+5:302021-09-09T04:13:52+5:30
————————————————— मराठा आरक्षणाचा घोळ, त्यानंतर कोरोनाचे संकट यामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा सतत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ही परीक्षा ...
—————————————————
मराठा आरक्षणाचा घोळ, त्यानंतर कोरोनाचे संकट यामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा सतत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ही परीक्षा होणार का? याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम होता. एकीकडे नियमित अभ्यास सुरू होता, तर दुसरीकडे परीक्षा नाही झाली तर काय? किंवा त्यासाठी सरकारकडे कोणत्या मार्गाने मागण्या मांडायच्या या द्विधा मनस्थितीत विद्यार्थी होते. अखेर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी ४ सप्टेंबरला पूर्व परीक्षा दिली. कोरोना काळामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेला उपस्थितही राहू शकले नाहीत. नुकताच पूर्व परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला. पुण्यातील एक हजाराहून अधिक उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
२००७ पासून महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्याआधीपासूनच पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी हजारो विद्यार्थी येत होते. घरची परिस्थिती बेताची, आई-वडील शेतात राबणारे, अशा परिस्थितीतही पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी होते. हा आकडा आज हजारो, लाखोंच्या घरात गेला आहे. परीक्षांच्या तयारीसाठी उपलब्ध असलेले अनेक क्लासेस, अभ्यासासाठी लवकर उपलब्ध होणारी पुस्तके, अनेकांचे मार्गदर्शन यांमुळे अधिकारी होण्याची स्वप्ने उराशी बाळगून दरवर्षी अनेक तरुण पुण्यात येतात. केवळ एमपीएससी, यूपीएससी नाही तर एसएससी, बँकिंग, क्लार्क, सेनादल, निमलष्करी दल, पोलीस भरती, नेट-सेट अशा अनेक स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तरुण-तरुणी पुणे गाठतात. पुण्याच्या जवळच्या जिल्ह्यांमधून येणाऱ्या उमेदवारांबरोबरच मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधून पुण्यात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात येऊन एखादा अभ्यासक्रम करत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे आणि केवळ स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात येणारे असे दोन गट त्यात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थीही झोकून देऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यासाठी पुण्यात एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठीही ते प्रयत्न करतात.
गेल्या काही वर्षांपासून अनेक अधिकारी पुण्यात विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करतात. त्यामुळे आपणही कष्ट करून अधिकारी होऊ शकतो, असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये वाढला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परिपूर्ण तयारी करता यावी, अभ्यासावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी कुटुंबापासून दूर पुण्यात जाण्याचा कल वाढला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी सांगतात की, पुण्यात परीक्षांची तयारी करण्यासाठी सुलभता आहे. अभ्यासिका, ग्रंथालये, क्लासेस, तीन-चार जण एका घरात राहत असल्याने राहण्याचा खर्चही कमी येतो यामुळे पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणे सोपे ठरते. अनेकांचे मार्गदर्शन सहजपणे मिळते. त्यामुळे परीक्षा देताना कोणत्या सुधारणा कराव्यात, मुलाखतीसाठी कोणती तयारी करावी, लिखाण कसे सुधारावे, तयारीला प्राधान्य कसे द्यावे या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे सहज मिळतात. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षा देताना पूर्ण आत्मविश्वासाने आम्ही सामोरे जातो.
सातारा येथून पुण्यात यूपीएससीच्या तयारीसाठी आलेल्या विद्यार्थिनीने सांगितले की, मी याआधी दिल्ली येथे यूपीएससीची तयारी करत होते. मात्र, कोरोना काळात तेथे राहण्याच्या अनेक अडचणी आल्या. त्यामुळे सध्या पुण्यात राहून तयारी करत आहे. पुण्यात मार्गदर्शन मिळणे सुलभ आहे. त्याचप्रमाणे कोरोनासारखे संकट पुन्हा ओढावल्यास घरी परतणेही सोपे आहे. त्यामुळे परराज्यात जाण्यापेक्षा पुण्यात राहून तयारी करणे सहज शक्य होत आहे.
पुण्यात अनेक मित्र-मैत्रिणींची तयारी करताना मदत होते. गावाहून एखादा मित्र आला तर आम्ही त्याला सामावून घेतो. तसेच परीक्षेसाठी त्याला मदतही करतो. कोरोना काळात अर्थकारण कोलमडले असले तरी परीक्षा पूर्ण तयारीनिशी देण्याचा प्रयत्न असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. पुण्यात अभ्यास करताना घरी असल्यासारखे वाटते, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. त्यामुळे भविष्यात पुण्याची स्पर्धा परीक्षांचे केंद्र ही ओळख आणखी ठळक होणार आहे.
- उमेश जाधव