पुणे : स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची चुरस वाढली, निवडणूक ७ मार्चला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 07:22 AM2018-03-01T07:22:25+5:302018-03-01T07:22:25+5:30

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार असणार, हे नक्की असले तरी तो कोण असणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Pune: Chairmanship of the Standing Committee was increased, the elections will be held on March 7 | पुणे : स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची चुरस वाढली, निवडणूक ७ मार्चला

पुणे : स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची चुरस वाढली, निवडणूक ७ मार्चला

Next

पुणे : स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार असणार, हे नक्की असले तरी तो कोण असणार, याची उत्सुकता वाढली आहे. तीन आमदारांच्या निकटच्या नातेवाईकांपैकी तो असेल की पक्षश्रेष्ठी धक्कादायक निर्णय घेणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर, आमदार जगदीश मुळीक यांचे भाऊ योगेश मुळीक, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे भाऊ सुनील कांबळे यांच्यात स्पर्धा निर्माण झाली आहेत. महापालिकेतील सत्ताकाळात आपण एकदाही पदाची मागणी केलेली नाही, त्यामुळे आईला हे पद द्यावे, अशी टिळेकर यांची आग्रही मागणी आहे. मात्र महापौरपदी पुढील सव्वावर्ष पुन्हा महिलाच असल्याने महापालिकेतील दोन महत्त्वाची पदे महिलांकडे कशी द्यायची, असा प्रश्न यात निर्माण झाला आहे. तरीही शिल्लक राहिलेल्या नावांमध्येही जोरदार चुरस आहे.
आमदार जगदीश मुळीक यांनीही टिळेकर यांच्याप्रमाणेच दावा केला आहे. विधानसभा मतदार संघ भक्कम ठेवण्याच्या आपल्या राजकीय व्युहाचा एक भाग म्हणून योगेश यांना संधी द्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांच्या तुलनेत सुनील कांबळे यांचा दावा भक्कम ठरतो आहे. कांबळे गेली अनेक वर्षे कासेवाडी, लोहियानगर सारख्या भागात भाजपाचे काम करीत आहेत. पक्षद्रोह केल्याचे एकही उदाहरण त्यांच्या नावावर नाही. मात्र समाजकल्याण राज्यमंत्रीपद त्यांच्या घरात असल्याने एकाच घरात दोन महत्त्वाची पदे द्यायची का, अशी विचारणा करण्यात येत आहे. त्याचा प्रतिवाद कांबळे यांच्याकडून भावाचे राजकारण वेगळे व माझे वेगळे, मग मला संधी मिळणारच नाही का, असा केला जात आहे.
याशिवाय मंजुषा नागपुरे यांचेही नाव चर्चेत आले आहे. स्थायी समिती सदस्यपदाचे त्यांचे हे दुसरे वर्ष आहे. त्या अनुभवावर त्यांनीही अध्यक्षपदावर दावा केला असल्याची चर्चा आहे. अध्यक्षपद कोणाला द्यायचे, याचा निर्णय सर्वस्वी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर अवलंबून आहे.
-गिरीश बापट हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बोलून निर्णय घेतील, अशी माहिती पक्षाच्या वर्तुळातून दिली. येत्या शनिवारी (दि.३) दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यादिवशी भाजपाकडून एकच अर्ज दाखल झाला तर त्याचदिवशी अध्यक्ष कोण होणार याचा निकाल लागेल. मात्र एकापेक्षा जास्त अर्ज दाखल झाले तर त्यासाठी निवडणुकीच्या दिवसापर्यंत (दि.७ मार्च) प्रतीक्षा करावी लागणार आहे.
-समितीमधील विरोधकांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांचे वर्चस्व अगदीच कमी म्हणजे ६ सदस्य इतकेच आहे. भाजपाचे १० सदस्य आहेत. त्यामुळे विरोधकांकडून केवळ प्रतिकात्मक म्हणून निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे किंवा न लढवण्याचा निर्णय झाला तर अध्यक्षपद बिनविरोधही निवडले जाईल.

Web Title: Pune: Chairmanship of the Standing Committee was increased, the elections will be held on March 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.