‘चांदणी चौक पादचारी पूल बांधणी आराखड्याबाबत पुनर्विचार करा’
By राजू हिंगे | Updated: March 18, 2025 17:35 IST2025-03-18T17:33:42+5:302025-03-18T17:35:39+5:30
आवश्यक सुधारणा करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. अन्यथा या विरोधात जनआंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

‘चांदणी चौक पादचारी पूल बांधणी आराखड्याबाबत पुनर्विचार करा’
पुणे : चांदणी चौक येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात होत आहे. मात्र, प्रस्तावित आराखडा नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीचा आणि कमी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलाच्या आराखड्याचा पुनर्विचार करून प्रत्यक्ष पाहणी करावी. आवश्यक सुधारणा करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. अन्यथा या विरोधात जनआंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक संजय कदम यांना निवेदनही दिले आहे.
विशेषतः पुलाची रचना ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, लहान मुले आणि महिलांना वापरता येण्यास कठीण असल्यामुळे हा पूल निरुपयोगी ठरू शकतो. परिणामी, नागरिक महामार्ग थेट ओलांडण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते. या ठिकाणी पुणे मेट्रोचे काम प्रस्तावित असून, भविष्यात मेट्रो स्थानक देखील येथे उभारले जाणार आहे.
त्यामुळे हा पादचारी मार्ग भविष्यातील वाहतूक व्यवस्थेशी सुसंगत असावा. मेट्रो स्थानकाशी थेट जोडणी असलेला पूल, लिफ्ट किंवा एक्सेलेटरची सुविधा आणि नागरिकांसाठी अधिक सुलभ पर्याय असणे गरजेचे आहे, असे दिलीप वेडेपाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.