पुणेकरांची होतेय व्हाया एअर फसवणूक
By admin | Published: April 15, 2015 12:53 AM2015-04-15T00:53:57+5:302015-04-15T00:53:57+5:30
काही गुंठे जागेसाठी एक कोटी रुपयांचे डिपॉझीट.... एक लाख रुपयांचे महिना भाडे.... अशी एका रात्रीत उच्चभ्रू वर्गात जाण्याची संधी नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून येत असेल,
पुणे : काही गुंठे जागेसाठी एक कोटी रुपयांचे डिपॉझीट.... एक लाख रुपयांचे महिना भाडे.... अशी एका रात्रीत उच्चभ्रू वर्गात जाण्याची संधी नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून येत असेल, तर सहाजिकच कोणीही प्रयत्न करेल. मानवी स्वभावाच्या याच मानसिकतेचा फायदा घेऊन लाखो रुपयांना गंडा घालणारी टोळी पुण्यात राजरोस लूट करीत आहे.
गणेश पेठेतील नझीर शेख यांच्याबाबत असाच प्रकार घडला आहे. ‘मोबाईल टॉवरसाठी जागा पाहिजे,’ असे सांगितले गेले. त्यात एक कोटी रुपयांचे डीपॉझीट व एक लाख रुपये महिना भाडे देण्याचा उल्लेख होता. शेख यांची रांजणगाव एमआयडीसी येथे एक गुंठा जागा आहे. मोठी रक्कम असल्याने त्यांनी तत्काळ संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला.
कंपनीच्या प्रतिनिधीने जागेचे लोकेशन व इतर माहिती विचारली. तसेच, सॅटेलाईटवरून जागा चेक करून कंपनीची संमती आल्यावर फोन करतो, असे सांगितले. त्यानुसार संबंधित प्रतिनिधीने तुमची जागा सिलेक्ट झाल्याचा संदेश दिला. इतकेच काय तर संचार निगम टॉवर लिमिटेड कंपनीच्या संचालकांची स्वाक्षरी असलेला लेटरहेड, एका नामांकित कंपनीचा मोबाई टॉवर बसविण्याबाबतचा उल्लेख, इतकेच काय तर १५ वर्षांसाठी एक कोटी रुपये जागेचे डिपॉझीट व एक लाख महिना भाडे मंजूर झाल्याचे त्यांना ई-मेलवरून कळविण्यात आले. अटी-शर्तींचा उल्लेख असलेल्या पंधराशे रुपयांच्या मुंद्राकाची स्कॅन कॉपीदेखील पाठविण्यात आली.
यामुळे शेख यांचादेखील विश्वास बसला. कंपनीने नोंदणी फी म्हणून सुरुवातीस २,१०० रुपये घेतले. त्याची रीतसर पावतीदेखील त्यांना देण्यात आली. त्यानंतर सरकारला करापोटी साडेअठरा हजार रुपये भरावे लागतील, असे सांगून ते पैसेदेखील घेतले. इतकेच काय, तर विविध बिलांपोटी २० हजार रुपये बँक खात्यात भरण्यास सांगितले. पैसे भरूनही मोबाईल टॉवर बसविण्याची चिन्हे न दिसल्याने त्यांनी संबंधित प्रतिनिधीशी मोबाईलवरून संपर्क साधला असता, मोबाईल बंद होता. यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी शेख यांनी ३० मार्च रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून, पोलिसांनी संबंधित कंपनीच्या अमित कुमार व कृष्णकुमार या आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फसवणुकीचा
हा नववा गुन्हा....
मोबाईल टॉवरचे आमिष दाखवून फसवणुकीचा शेख यांचा नववा गुन्हा पोलीस दफ्तरी दाखल झाला आहे. शिवाजीनगर (२०११), खडकी (२०१२), वारजे-माळवाडी, मार्केट यार्ड भारती विद्यापीठ, सांगवी ( सर्व २०१३), लष्कर (२०१४), बंडगार्डन (२०१४) या पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अजहर खान यांनी माहिती अधिकारात ही माहिती उघड केली आहे.