Pune Rain Update: पुणेकरांची तारांबळ उडाली; सकाळपासूनच पावसाची धुव्वादार बॅटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 09:30 AM2022-07-06T09:30:41+5:302022-07-06T09:30:47+5:30
दोन दिवसाच्या पावसाने धरणातही पाणीसाठा वाढू लागला आहे
पुणे : राज्यात जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. पावसाअभावी शेताची अनेक कामे राहिल्याने बळीराजा चिंतेत दिसू लागला होता. परंतु गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाने जोर धरला आहे. पुण्याच्या चारही धरणातपाणीसाठा कमी होऊ लागला होता. त्यामुळे महापालिकेने पाणी कपातीचा निर्णयही घेतला. पण रविवारपासून शहरात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. कालही माध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. आज मात्र पहाटेपासूनच पावसाच्या धुव्वादार बॅटिंगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सकाळी उठून कामाला जाणाऱ्या पुणेकरांची तारांबळ उडाल्याचे चित्र शहरात दिसून आले आहे. दोन दिवसाच्या पावसाने धरणातही पाणीसाठा वाढू लागला आहे.
शहरात सकाळीच नागरिक विविध कामासाठी बाहेर पडतात. पण पावसामुळे रस्त्यावर गर्दी दिसून आली नाही. पण रस्त्यावर अनेक ठिकणी पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले आहे. मुलांची सुद्धा शाळेत जाताना गडबड दिसून येत होती. सततच्या पावसाने वातावरणात थंडावाही जाणवू लागला आहे. राज्यात सर्वदूर पावसाने आता जोर पकडला असून, येत्या चार दिवसांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येत्या तीन दिवसांत शहरात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
धरण क्षेत्रात झालेला पाऊस
हवामान विभागाने केलेल्या नोंदीनुसार रात्री साडेआठ वाजता शिवाजीनगर येथे २.८, लोहगाव येथे ८, लवळे येथे ४.५ तर चिंचवड येथे ११.५ मिमी पाऊस पडला. दुसरीकडे धरण क्षेत्रांत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला येथे १०, पानशेत येथे २१, वरसगाव येथे २० तर टेमघर येथे ३० मिमी पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुण्यात येत्या तीन दिवसांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.