Pune Corona: पुणेकर लवकरच कोरोनामुक्त होणार; तब्बल २ वर्षांनंतर दिलासादायक चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 03:40 PM2022-03-02T15:40:16+5:302022-03-02T15:40:25+5:30
पहिल्या लाटेनंतर गेल्या दोन वर्षांमध्ये प्रथमच सक्रिय रुग्णसंख्या १००० पर्यंत खाली आली
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : दोन वर्षांत पुणेकरांनी कोरोनाच्या एकामागून एक तीन लाटा अनुभवल्या. अनेकांनी घरातील व्यक्ती, जवळची माणसे, आप्तेष्ट अनपेक्षितपणे गमावले. हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्याची धडपड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरअभावी प्राण गमावण्याची वेळ, इंजेक्शन, औैषधांचा तुटवडा अशी अंगावर काटा आणणारी परिस्थिती निर्माण झाली. तब्बल दोन वर्षांनंतर पुणेकरांसाठी दिलासादायक चित्र आहे. पहिल्या लाटेनंतर गेल्या दोन वर्षांमध्ये प्रथमच सक्रिय रुग्णसंख्या १००० पर्यंत खाली आली.
मार्च २०२० मध्ये पुण्यातच महाराष्ट्रातील पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली. पुढील तीन महिन्यांतच रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. पुणे हे देशातील हॉटस्पॉट ठरले. सप्टेंबर २०२० मध्ये पहिली लाट, मार्च २०२१ मध्ये दुसरी लाट, जानेवारी २०२२ मध्ये तिसरी लाट असे एकामागून एक धक्के पुणेकरांनी अनुभवले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्हिटी रेट २९ टक्के, तर तिसऱ्या लाटेत ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला. तिसऱ्या लाटेत विषाणूचा संसर्ग सर्वाधिक झाला असला तरी ही लाट दीड महिन्यात ओसरली आणि पुणेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
तीन दिवसांपासून रोजची रुग्णसंख्या, सक्रिय रुग्णसंख्या कमी होत आहे. २०२१ मध्ये सर्वांत कमी रुग्ण २५ जानेवारी रोजी नोंदवले गेले होते. ती संख्या ९८ इतकी होती. सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या १८ एप्रिल २०२१ रोजी ५६ हजार ६३६ इतकी होती, त्याच वर्षातील सर्वांत कमी सक्रिय रुग्णसंख्या ७ फेब्रुवारी रोजी १३८३ इतकी होती. त्यानंतर २०२२ मध्ये गेल्या दोन वर्षांतील सर्वेंत कमी १ हजार ६६ इतकी कमी सक्रिय रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. सोमवारी, २८ फेब्रुवारी रोजी रोजची सर्वांत कमी म्हणजे ४४ इतकी रुग्णसंख्या नोंदवली.