New Year 2022: पुणेकरांनो 'न्यू इयर' घरातच साजरा करा; महापालिकेचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 02:16 PM2021-12-30T14:16:44+5:302021-12-30T14:17:05+5:30
पुणे महापालिकेने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शहरातही फटाक्यांची आतिषबाजी, कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक / कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे.
पुणे : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडता, घरीच राहून साध्या पध्दतीने नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे. पुणे महापालिकेने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शहरातही फटाक्यांची आतिषबाजी, कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक / कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशात शासनाच्या गृहविभागाच्या परिपत्रकातील सूचनांचे पालन करण्याबाबत सांगितले आहे. यामध्ये रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या ५० टक्के तर खुल्या जागेतील कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्के मर्यादा घालून देण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, मास्कचा वापर अनिवार्य राहिल आदी सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या विशेषत: ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सदर नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.