Corona Guidelines Pune : अजितदादांचा पुणेकरांना दिलासा नाहीच! शहरातील कोरोना निर्बंध ठेवले कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 03:44 PM2021-07-02T15:44:52+5:302021-07-02T15:59:57+5:30
पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला असून काही दिवसांपूर्वी ४.६ असलेला रेट आता ५.३ टक्के झाला आहे.
पुणे : पुण्याचा पॉझिटिव्हिटी दर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत वाढला आहे. काही दिवसांपूर्वी जो पॉझिटिव्हिटी रेट ४.६ होता आता तो 5.3 झाला आहे. याच धर्तीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना कोरोना निर्बंधात सूट दिली नसून आहे ते निर्बंध कायम ठेवले आहे. त्यामुळे शहरातील दुकाने ही सकाळी ७ दुपारी ४ पर्यंतच सुरु राहणार आहे. तसेच मॉल, सिनेमागृह पूर्णपणे बंद राहणार आहे.
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पवारांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, ३० जूनच्या रिपोर्टनुसार पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला असून काही दिवसांपूर्वी ४.६ असलेला रेट ५.३ टक्के झाल्याचा सांगितले. यामुळे मागील आठवड्यात लागू केलेले कोरोना निर्बंधच कायम ठेवले आहे. तसेच त्यांनी यावेळी या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. याचवेळी पुणे शहर ५१९ रुग्णवाहिका शहर आणि जिल्ह्यासाठी घेण्यात आल्या असल्याची माहिती दिली.
पुण्यातील मॉल का बंद? अजित पवारांनी सांगितले हे कारण..
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बंद करण्यात आलेले मॉलकधी सुरु करणार याबाबत देखील पवारांनी आपली भमिका स्पष्ट केली आहे. पवार म्हणाले, पुण्यातील मॉल्स सुरू करण्याबाबत विचार केला होता. परंतु, मॉलमधील एसी आणि ग्राहक संख्या मोठी असल्याने ते बंद ठेवण्याचाच निर्णय घेतला आहे.
पुणे कसं सुरु राहणार ?
राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे पालिकेनेही निर्बंध लागू केले आहेत. यापूर्वी संध्याकाळी सातपर्यंत असलेली दुकानांची वेळ तीन तासांनी कमी करण्यात आली आहे. तर, हॉटेल-रेस्टॉरंट-बार यांची वेळही सहा तासांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी, हॉटेल व्यवसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
----
सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, लग्न व मनोरंजन कार्यक्रम यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे ५० लोकांच्या उपस्थितीत घेता येणार आहेत. या कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंतच परवानगी राहणार आहे. हे कार्यक्रम ३ तासांपेक्षा अधिक काळ असू नयेत असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
----
सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. दैनंदिन पूजा / अर्चना करण्याकरिता परवानगी राहील.
अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
-----
ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम सुरु ठेवता येतील. बाहेरून येणारे कामगार असल्यास असे बांधकाम दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील.
-----
१.पीएमपीएमएमएल आसन क्षमतेच्या ५० टक्के
क्षमतेने सुरु राहील.
२. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना नियमानुसार प्रवास करण्यास परवानगी.
३. खाजगी वाहनातून, बसेस तसेच लाब अंतराच्या रेल्वेमधून आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी.
४. ही वाहने शासनाने घोषित केलेल्या लेव्हल ५ मधील ठिकाणी थांबणार असतील तर ई-पास बंधनकारक.
५. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग, कच्चा माल उत्पादन करणारे युनिट, पॅकेजिंग करणारे युनिट आणि संपूर्ण पुरवठा साखळीला परवानगी.
------