मोरया! लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी पुणेकर सज्ज, जाणून घ्या ’श्रीं’ च्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 04:37 PM2024-09-06T16:37:14+5:302024-09-06T16:37:40+5:30
पुण्याच्या गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा असून, घरोघरी वाजतगाजत गणरायाचे आगमन होणार
पुणे : गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी असून, यंदा गणेशोत्सव दहा नव्हे, तर अकरा दिवसांचा असणार आहे. यामुळे 'गणपती बाप्पा मोरया'चा जल्लोष करण्यासाठी अतिरिक्त एक दिवस मिळणार आहे. शनिवारी (दि. ७) भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ पर्यंत 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठापना करता येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या 'श्रीं'ची प्रतिष्ठापना मध्यान्हनंतरदेखील करता येऊ शकते. यंदा गणेशचतुर्थी दि. ७ सप्टेंबरला असून, अनंतचतुदर्शी दि. १७ सप्टेंबरला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव दहा नव्हे, तर अकरा दिवस साजरा करता येणार आहे, अशी माहिती 'दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
‘बुद्धीची देवता आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ‘श्रीगणेशा’चे स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा असून, घरोघरी वाजतगाजत गणरायाचे आगमन होणार आहे. गणेश भक्तांना गुरुजींच्या सोयीने घरातील श्रीगणेशाची प्रतिष्ठापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता विशिष्ट नक्षत्र, वार, योग, विष्टि करण (भद्रा) तसेच राहुकाल, आदी वर्ज्य नाही. शिवालिखित आदी कोणतीही कोष्टके पाहण्याची आवश्यकता नसल्याचे दाते यांनी सांगितले.
आज घरोघरी साजरे हरितालिका पूजन
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरितालिका पूजन करण्याची परंपरा आहे. विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, ऐश्वर्य आणि सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात. हा दिवस गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असतो. महिला देवी गौरीसह शिवलिंगाची पूजा करतात. आज महिलांनी घरोघरी हरितालिकांच्या प्रतिमेचे पूजन करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.