...नागरिकांनी एवढे केले, तरी मदत होईल! सफाई कर्मचा-यांच्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:01 IST2022-02-10T15:01:10+5:302022-02-10T15:01:20+5:30
नागरिकांना ओला, सुका कचरा वेगळा टाकावा, रस्त्यात कुठेही कच-याच्या पिशव्या फेकू नयेत, एवढ्या गोष्टी पाळल्या तरी मदत होईल’, अशा भावना सफाई कर्मचा-यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

...नागरिकांनी एवढे केले, तरी मदत होईल! सफाई कर्मचा-यांच्या भावना
पुणे: सकाळच्या वेळी सर्वसामान्य नागरिक नव्या दिवसाची स्वप्ने पाहात असतात, त्याचवेळी सफाई कर्मचारी मात्र कचरा उचलण्याचे, ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे, ड्रेनेज लाईन साफ करण्याचे काम करतात. ‘सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, वास सहन व्हायचा नाही, आता सवय झाली आहे. नागरिकांना ओला, सुका कचरा वेगळा टाकावा, रस्त्यात कुठेही कच-याच्या पिशव्या फेकू नयेत, एवढ्या गोष्टी पाळल्या तरी मदत होईल’, अशा भावना सफाई कर्मचा-यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
कायमस्वरुपी कामगारांना महापालिकेकडून, तर कंत्राटी कर्मचा-यांना ठेकेदाराकडून झाडू, मास्क, हँडग्लोव्हज, गमबूट, साबण, सॅनिटायझर अशी साधने मिळतात. पुणे महापालिकेअंतर्गत ६००० कायमस्वरुपी, तर ३५०० कंत्राट पध्दतीवर काम करणारे सफाई कर्मचारी आहेत, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.
''मी गेल्या तीन वर्षांपासून झाडू खात्यात काम करते. कचरा गोळा करायचा, पोत्यात भरायचा, कचरा पॉईंटवर जाऊन गाडीत टाकायचा, असे कामाचे स्वरूप असते. बऱ्याचदा लोकांनी ओला, सुका कचरा एकत्र टाकलेला असतो. कधी काचा लागतात, ओल्या कच-याचा, सॅनिटरी पॅडच्या कच-याचा वास येतो. आता कामाची सवय झाली आहे. पगारही व्यवस्थित मिळतो. माझा मुलगा ४ वर्षांचा आहे. त्याने खूप शिकावे आणि माझ्यासारखे काम त्याला करावे लागू नये, असे वाटते असे सफाई कर्मचारी रूपाली साखळे यांनी सांगितले.''
''मी कचऱ्याच्या गाडीवर काम करतो. बऱ्याचदा लोक ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकत नाहीत किंवा रस्त्यावरच कचरा टाकून जातात. आम्ही आमच्या परीने रस्त्यावर कचरा टाकू नका, वेगवेगळा करून गाडीत टाका, असे सांगण्याचा प्रयत्न करतो. काही लोक ऐकतात, तर काहीजण ऐकत नाहीत. आम्हाला तर आमचे काम करायचेच आहे. कोरोनाची साथ आली, तेव्हा सुरुवातीला आपण घराबाहेर पडत असल्याने आपल्यामुळे घरच्यांना त्रास होणार नाही ना, अशी भीती वाटायची असं सफाई कर्मचारी राज वाल्मिकी म्हणाल्या आहेत.''
''कर्मचारी सकाळी ६ ते १०.३० आणि ११ ते १.३० अशा वेळेत काम करतात. मुख्य रस्ते दररोज, तर अंतर्गत रस्ते दोन दिवसांतून एकदा स्वच्छ केले जातात. त्यांना मास्क, सॅनिटायझर, ॲप्रन, खराटे, साबण असे सर्व साहित्य नियमितपणे पुरवले जाते. दवाखान्याचे कार्डही देण्यात आले आहे. त्यानुसार त्यांना मोफत उपचारांची सोय करण्यात आली आहे असे कंत्राटदार शरद पाटोळे यांनी सांगितले.''