पुणेकरांनो बसमध्ये कंडक्टरची वाट पाहू नका; लवकरच पीएमपीत मिळणार ऑनलाइन तिकीट
By नितीश गोवंडे | Published: April 16, 2023 03:57 PM2023-04-16T15:57:01+5:302023-04-16T15:57:13+5:30
नागरिकांना चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी पीएमपी नेहमीच प्रयत्नशील
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने ऍपद्वारे पेमेंट स्विकारण्याच्या निर्णयानंतर आता ऑनलाइन तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एका ऍपची निर्मिती देखील सुरू करण्यात आली आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार असून, त्यामुळे ऑनलाइन पेमेंट, तिकीट आणि मार्गांची माहिती पुणेकरांना या पीएमपीच्या ऍपद्वारे मिळणार आहे.
देशात डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत विविध सुविधा ऑनलाइन पद्धतीने दिल्या जात आहेत. पीएमपी प्रशासनाने देखील काही सुविधा ऑनलाइन पद्धतीने देण्यासाठी पावले उचलली असून, यासाठीचे काम सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वीच पीएमपी प्रशासनाने ऑनलाइन पेमेंट ऍपच्या माध्यमातून तिकीटाचे पैसे स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पुणे दर्शनच्या दोन बसमध्ये प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा यशस्वी झाल्यास इतर बसमध्ये लवकरच ही सुविधा सुरू केली जाणार आहे. तसेच पीएमपीचे संकेतस्थळ अद्ययावत करून संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध सुविधा देण्यात येणार आहेत. पीएमपीची आयटीएमएस सुविधा सुरू करण्यासाठी पीएमपी प्रशासन आणि गुगल यांच्यात करार झाला असून, याचे काम देखील प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ही सुविधा सुरू झाल्यास नागरिकांना बसचे लाइव्ह लोकेशन ट्रक करता येणार आहे. तसेच बसची वेळ, मार्ग आणि नंबर ऑनलाइन पद्धतीने चेक करता येणार आहे. पीएमपीच्या या सर्व सुविधा सुरू झाल्यास पुणेकरांना वातानुकूलित सेवेबरोबरच अत्याधुनिक डिजिटल सेवांचा लाभ घेता येणार आहे.
''पुणेकरांना अत्याधुनिक डिजिटल सुविधा देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांना चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. - ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, पीएमपीएमएल''