Pune Metro: पुणेकरांचे स्वप्न सत्यात उतरलंय; भविष्यात मेट्रो ठरणार पुण्याची ‘लाइफलाइन’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 04:19 PM2023-01-02T16:19:46+5:302023-01-02T16:20:06+5:30

मेट्रोचे जाळे उत्तम पद्धतीने शहरात आणि उपनगरांना जोडणारे झाले, तर येत्या काळात रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची शक्यता

pune citizens dream has come true metro will be Pune lifeline in the future | Pune Metro: पुणेकरांचे स्वप्न सत्यात उतरलंय; भविष्यात मेट्रो ठरणार पुण्याची ‘लाइफलाइन’

Pune Metro: पुणेकरांचे स्वप्न सत्यात उतरलंय; भविष्यात मेट्रो ठरणार पुण्याची ‘लाइफलाइन’

googlenewsNext

संभाजी सोनकांबळे

- पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना मेट्रो सिटी म्हणून शहराचा उदय झाला. मेट्रोचे जाळे उत्तम पद्धतीने शहरात आणि उपनगरांना जोडणारे झाले, तर येत्या काळात रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची शक्यता आहे. असे झाले, तर मोठाच दिलासा नागरिकांना मिळेल. मात्र, मेट्रोचे काम गतीने होण्याची आवश्यकता असून, वाहतुकीच्या बाबतीत दीर्घकालीन धोरण गरजेचे आहे.

पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असणारी पीएमपीएमएल महत्त्वाची आहेच. मात्र, झपाट्याने वाढणाऱ्या शहराचा व लोकसंख्येचा विचार करता येत्या काही वर्षांत सार्वजनिक वाहतुकीत मोठे बदल व सुधारणा होणे क्रमप्राप्त आहे. ‘शांततामय शहर’ या संकल्पनेला छेद जाऊ न देता प्रस्तावित विकासकामे पूर्णत्वास नेण्याचे इप्सित ध्येय गाठण्याची कसरत पुण्याच्या कारभाऱ्यांना करावी लागणार आहे. या दिशेने विविध प्रायोगिक उपक्रम सुरूही आहेत. यातील बीआरटीसारख्या फसलेल्या उपक्रमांमुळे वाहतुकीला गती मिळण्याऐवजी अडसरच ठरल्याचे चित्र असले, तरीही शहरातील मेट्रो प्रकल्प मात्र पुणेकरांच्या पसंतीस उतरत आहे. पुण्याचा सन २०४५ पर्यंतचा विचार करता हवेतून उडणाऱ्या बसचे स्वप्न आपण पाहत असलो, तरीही प्रत्यक्षात जमिनीवरून (रूळावरून) धावणारी मेट्राेच पुण्याची ‘लाइफलाइन’ म्हणून ओळखली जाईल, असा विश्वास जाणकार व्यक्त करतात.

शहरातील प्रशस्त व हिरवेगार रस्ते ही पुण्याची मुख्य ओळख आहे. देशभरातील तरुणांसह अगदी निवृत्त व्यक्तीही पुण्याला प्राधान्य देतात. पुणे शहराचा विस्तारही वेगाने होत असून, मुख्य शहर असलेल्या पेठांच्या आजूबाजूला गजबजलेली उपनगरे झपाट्याने वाढत आहेत. याचा ताण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात पडला आहे. प्रवाशांनी खच्चून भरलेली बस वाहतूक कोडींच्या विळख्यातून हळूहळू मार्ग काढून पुढे सरकतेय असे चित्र शहरात अगदी सहज कुठेही दिसते.

खासगी चारचाकी वाहनांची वाढती संख्या व रस्त्यांची दुर्दशा यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून प्रशासनाने विविध भागांमध्ये उड्डाणपूल बांधण्याचा सपाटा लावला आहे. परंतु, मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पुलांच्या बांधकामांमुळेही वाहतूक कोडींत भरच पडत असून, वाहनचालकांना अशा चिंचोळ्या रस्त्यांवरून वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहेत. भविष्याचा वेध घेता यावर सक्षम, सुरक्षित व वेगवान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हाच शाश्वत उपाय असल्याचे जाणकार सांगतात. शहरातील वाहतूक कोडींच्या समस्येवर मेट्राे हाच वाढत्या लोकसंख्येसाठी सुरक्षित व वेगवान पर्याय ठरू शकेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

महामेट्रोची सप्टेंबर २०२२पर्यंत प्रगतिपथावर असलेली कामे

- पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी : १०० टक्के पूर्ण
- वनाज ते गरवारे : १०० टक्के पूर्ण
- फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट : ७५ टक्के
- गरवारे ते सिव्हिल कोर्ट : ८४ टक्के
- सिव्हिल कोर्ट ते रामवाडी : ८३ टक्के
- सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट : ४८ टक्के

खडकवासला-खराडी २५ कि.मी. मार्ग

‘महामेट्रो’कडून खडकवासला ते खराडी या २५ किलोमीटर अंतराचा मेट्रोचा प्रारूप प्रकल्प आराखडा महापालिकेस सादर केला आहे. या मार्गासाठी सुमारे ८ हजार ५६५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. खडकवासला ते स्वारगेट-हडपसर आणि खराडी असा हा स्वतंत्र मार्ग असणार आहे. या मार्गावर २२ स्थानके असणार आहेत.

वनाज ते रामवाडी मार्गाला पसंती

पुणे मेट्रो प्रकल्पात एकूण ३३.२ किमी लांबीचे दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक वनाज ते रामवाडी आणि दुसरा पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गात कृषी महाविद्यालय ते स्वारगेट असा सहा किलोमीटरचा भूमिगत मार्ग आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे कामही सुरू आहे.

उपनगरातील चाकरमान्यांसह सर्वांनाच मेट्रो फायद्याची

सध्या पुणे मेट्रोचे काम विविध टप्प्यात सुरू असून सहा कोच उभे राहतील, असे प्रशस्त मेट्रोचे स्टेशन असेल. भविष्यातील प्रवाशांची गरज ओळखून शहरात काही मार्ग प्रपोज करता येतील. मेट्रोचे भाडे परवडणारे असणार आहे. यामुळे उपनगरातील चाकरमान्यांसह सर्वांनाच मेट्रो फायद्याची ठरेल. - हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक (प्रशासन आणि जनसंपर्क) पुणे महामेट्रो

Web Title: pune citizens dream has come true metro will be Pune lifeline in the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.