धक्कादायक वास्तव! पुणेकरांची सायंकाळ वाहतुक कोंडीत; खासगी कंपनीच्या अहवालातून बाब समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:05+5:30
साधारणपणे सायंकाळी ६ ते ८ या वेळेत प्रचंड वाहतुक कोंडीचा पुणेकरांना करावा लागतो सामना
पुणे : भारतात राहण्यासाठी सर्वात सुलभ शहर म्हणून गौरविण्यात आलेल्या पुणे शहरातील वाहतुकीची स्थिती मात्र गंभीर बनली आहे. पुणेकरांची दररोजची सायंकाळ वाहतुक कोंडीत जात आहे. साधारणपणे सायंकाळी ६ ते ८ या वेळेत प्रचंड वाहतुक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही कोंडी उच्चांग गाठते, असे एका खासगी कंपनीच्या अहवालातून समोर आले आहे. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मागील वर्षी ११५ टक्के जादा वेळ लागल्याचे या संस्थेच्या पाहणीतून पुढे आले आहे.
‘टॉमटॉम’ या कंपनीने २०१९ मध्ये जगातील ५७ देशातील ४१६ शहरांच्या वाहतुकीचा अभ्यास केला आहे. त्याचा अहवाल कंपनीकडून नुकताच प्रसिध्द करण्यात आला आहे. या अहवालानुसार वाहतुक कोंडी होणाऱ्या शहरांच्या यादीत पुणे शहर जगात पाचव्या स्थानावर आले आहे. यावरून पुणे शहराची वाहतुकीची समस्या अत्यंत गंभीर बनल्याचे दिसून येते. अहवालानुसार, कोंडीमुळे सरासरी ६३ टक्के जादा वेळ लागत आहे. तसेच अहवामध्ये आठवड्यातील सातही दिवसांची मध्यरात्री १२ ते रात्री ११ या प्रत्येक तासाची वाहतुक कोंडीमुळे लागणाºया जादा वेळेची टक्केवारी दिली आहे. त्यामध्ये दिवसभरात सायंकाळी ५ ते ८ या तीन तासांमध्ये सर्वात जास्त कोंडी होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही कोंडी उच्चांकी पातळीवर जाते. यावेळेमध्ये खासगी, सरकारी कार्यालयातून घरी परतणारे चाकरमाने, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची गर्दी, खरेदीसह हॉटेलिंग, फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडणारे पुणेकर यांमुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढत जाते. परिणामी, बहुतेक प्रमुख रस्त्यांवर कोंडी पाहायला मिळते. रविवारी व शनिवार या दोन दिवशी बहुतेक कार्यालये, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने ही कोंडी काही प्रमाणात कमी असते.
अहवालातील आकडेवारीनुसार, मागील वर्षी शुक्रवारी कोंडीत सरासरी ११५ टक्के एवढा उच्चांकी वेळ लागला आहे. याच दिवशी वर्षभरातील प्रत्येक दिवस सर्वाधिक कोंडीचे ठरले आहेत. तर रविवार हा सर्वात कमी कोंडीचा वार ठरला आहे. सकाळी प्रामुख्याने ९ ते ११ ही वेळ कोंडीची असली तरी सायंकाळच्या तुलनेत हे प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे. तर शनिवारी दुपारनंतर रात्री ९ वाजेपर्यंत कोंडीमुळे लागणारा जादा वेळ जवळपास सारखाच आहे.
-------------------
२०१९ मधील सर्वाधिक कोंडीचा दिवस (जादा वेळ ९३ टक्के) - २ आॅगस्ट
२०१९ मधील सर्वात कमी कोंडीचा दिवस (जादा वेळ ३० टक्के) - २७ आॅक्टोबर
शहरातील कोंडीमुळ लागणारा सरासरी जादा वेळ - ६३ टक्के
महामार्ग व शहरातील रस्त्याची केलेली पाहणी - ४,३२,४७.८२८ किलोमीटर
शहरी भागातील रस्त्यांची पाहणी - ३,०६,१७,४६३ (एकाच रस्त्याची अनेकदा पाहणी केल्याने हे अंतर वाढले आहे.)