Pune Metro: पुणेकरांनो जमिनीखाली मेट्रोने प्रवास करण्यास तयार व्हा; भूमिगत स्थानकाचे ९५ टक्के काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 03:08 PM2023-01-19T15:08:10+5:302023-01-19T15:11:48+5:30
जमिनीखाली १०८ फुटांवर महामेट्रोने साकारले नवे पुणे
पुणे : महामेट्रोच्या सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानकाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या स्थानकाच्या माध्यमातून महामेट्रोने जमिनीखाली १०८ फुटांवर नवे पुणेच साकारले आहे. महामेट्रोचे भूमिगत व उन्नत असे दोन्ही मार्ग या स्थानकात एकत्र येत असून, येत्या काळात शिवाजीनगर-हिंजवडी या मेट्रोचे सुरुवातीचे शिवाजीनगर स्थानकही या भूमिगत स्थानकाला जोडण्यात येणार आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी बुधवारी या स्थानकाची माध्यमांना माहिती दिली. संचालक (प्रकल्प) अतुल गाडगीळ, संचालक (जनसंपर्क) हेमंत सोनवणे व मेट्रोचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. जमिनीखाली १०८ फूट अंतरावर मेट्रोचे हे शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे भूमिगत स्थानक आहे. ११ एकर जागेवर महामेट्रोने त्यात नवे पुणेच साकार केले आहे. त्याच्या बरोबर वरच्या बाजूस मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या उन्नत मार्गाचे स्थानक आहे. काही लाख लोकांना सामावून घेईल इतकी या स्थानकांची क्षमता आहे.
ही दोन्ही स्थानके १८ सरकते जिने, ८ लिफ्ट तसेच साध्या जिन्यांनी आतील बाजूने जोडण्यात आली आहेत. या स्थानकातून त्यामुळे मेट्रो बदलणे प्रवाशांसाठी अत्यंत सोपे असणार आहे. सर्व स्थानकांचे काम आता ९५ टक्के पूर्ण झाले आहे. फिनिशिंगचे काम शिल्लक आहे. या दोन्ही मार्गांवरची चाचणीही यशस्वी झाली आहे. आता सुरक्षा आयुक्तांकडून मेट्रोचे, स्थानकांचे परीक्षण केले जाईल. त्यानंतर मेट्रो व्यावसायिक तत्त्वावर चालवण्यासाठी सज्ज असेल, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले. फेब्रुवारीच्या मध्यावर ही चाचणी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
इंटरचेंज स्थानकामुळे आता चिंचवडवरून भुयारी मार्गाने येणारा मेट्रो प्रवासी या स्थानकामध्ये भुयारी स्थानकातून बाहेर येऊन आतील बाजूनेच उन्नत स्थानकावर येईल व तिथून कोथरूड मेट्रोमध्ये बसून कोथरूडला जाऊ शकेल. भविष्यात या स्थानकातून शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाच्या स्थानकात जाता येईल अशीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.