दिव्यांग क्रिकेटपटूला पुणेकरांकडून मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 03:46 PM2019-04-25T15:46:32+5:302019-04-25T17:33:45+5:30
एप्रिल महिन्यात झालेल्या बांग्लादेशविरुद्धच्या क्रिकेट सामान्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन घरी परतत असताना शैलेंद्रचे संपुर्ण क्रिकेट किट पुणे रेल्वे स्थानकावरील वेटींग रुममधून चोरीला गेले होते.
पुणे : दिव्यांगाच्या भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडू असलेल्या भोपाळमधील क्रिकेटपटूचे क्रिकेटचे संपूर्ण किट पुणे रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी चोरीला गेले. आपले किट चोरीला गेल्याने त्या खेळाडूमध्ये आलेली नकारात्मक भावना दूर करीत नवे किट देऊन पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने मदतीचा हात पुढे केला.
संस्थेतर्फे भारतीय व्हिलचेअर क्रिकेट टिममधील दिव्यांग क्रिकेटपटू शैलेंद यादव याला पोलीस आयुक्त कार्यालयात पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या हस्ते क्रिकेट किट भेट देण्यात आले. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, ॠषभ सर्जिकलचे संचालक अनुप गुजर, संस्थेचे अध्यक्ष जगदीश मुंदडा,यादव यांचे सहकारी उपस्थित होते.
के.व्यंकटेशम म्हणाले, यादव हे दिव्यांग असूनही एक उत्तम खेळाडू आहेत. आतापर्यंत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. यापुढेही क्रिकेटमध्ये त्यांनी चांगली कामगिरी करावी, याकरीता संस्थेने त्यांना मदतीचा हात दिला आहे. क्रिकेटची जी साधना यादव करीत आहेत, त्यात त्यांना यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शैलेंद्र म्हणाला, माझे किट चोरीला गेल्याने मला अत्यंत दु:ख झाले. मात्र, संस्थेने मला किट दिल्याने मला आनंद झाला आहे. देशासाठी अधिक जोमाने खेळण्याची ताकद यामाध्यमातून मला मिळाली आहे.
===
लोहमार्ग पोलिसांची उदासिनता
एप्रिल महिन्यात झालेल्या बांग्लादेशविरुद्धच्या क्रिकेट सामान्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन घरी परतत असताना शैलेंद्रचे संपुर्ण क्रिकेट किट पुणे रेल्वे स्थानकावरील वेटींग रुममधून चोरीला गेले होते. ही घटना 2 एप्रिल रोजी घडली होती. लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी केवळ सामान हरवल्याचा गुन्हा दाखल करुन घेतला. मात्र, चोरीचा गुन्हा दाखल केला नाही. आपले साहित्य मिळेल या आशेने शैलेंद्र काही दिवस पुण्यात राहिला. परंतू, हाती पडलेली निराशा घेऊन तो भोपाळला गेला. ही माहिती समजताच संस्थेच्यावतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला. मूळचा भोपाळचा शैलेंद्र या कार्यक्रमासाठी खास भोपाळहून पुण्यात आला होता. क्रिकेट कीटसह शैलेंद्रच्या प्रवास खर्चाचा भार संस्थेने उचलला आहे.