पुणेकर नंबर वनच! लोकअदालतीत १ लाख ८९ हजार प्रकरणे निकाली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 09:16 AM2023-12-12T09:16:20+5:302023-12-12T09:17:11+5:30
लोकअदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला
पुणे: लोकअदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. शनिवारी (दि. ९) झालेल्या लोकअदालतमध्ये १ लाख ८९ हजार ०२३ दावे निकाली काढण्यात प्राधिकरणाला यश आले आहे.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत पार पडली. त्यासाठी ११७ पॅनेलची नेमणूक करण्यात आली होती. त्या माध्यमातून विविध न्यायालयात प्रलंबित ३३ हजार ३५९ प्रकरणे आणि दाखलपूर्व १ लाख ५५ हजार ६६४ प्रकरणे, अशी एकूण १ लाख ८९ हजार ०२३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून ३६२ कोटी, ३१ लाख, ३७ हजार ३५४ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली.
लोकअदालतीत निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये तडजोड योग्य फौजदारी व दिवाणी, धनादेश बाउन्स, मोटार अपघात न्यायप्राधिकरण, कौटुंबिक वाद, कामगार वाद, भूसंपादन, नोकरी आणि महसूलविषयक प्रकरणे, विविध बँका, वित्तीय संस्था, दूरध्वनी व विद्युत विभाग यासह विविध दाखल व दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश होता.