चंद्रावरील ११,४१८ खड्डे बुजवले की काय? पुणेकरांचा सवाल; रस्ते अद्यापही खड्ड्यांतच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 01:45 PM2022-08-19T13:45:48+5:302022-08-19T13:46:31+5:30
महापालिकेच्या पथ विभागाकडून १ जून ते १८ ऑगस्ट या कालावधीत शहरातील ११ हजार ४१८ खड्डे बुजविल्याचा दावा
पुणे : पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर खड्डे पडणे व त्यातून मार्ग काढणे हे नागरिकांना दरवर्षी नित्याचे झाले आहे. परंतु, यंदाचा पावसाळा व रस्त्यांवरील खड्ड्यांतून मार्ग काढणे हे यावर्षी अधिकच खडतर झाले आहेत. या नरक यातनांमधून पाऊस काळ संपेपर्यंत तरी सुटका नसल्याचे महापालिका प्रशासनाच्या एकूणच कारभारावरून स्पष्ट होत आहे. जूनपासून तब्बल ११ हजार खड्डे बुजविले आहे. परंतु, आजही रस्त्यांमध्ये खड्डे दिसतात. त्यामुळे चंद्रावरील खड्डे बुजविले की काय, असा सवाल पुणेकर विचारत आहेत.
महापालिकेच्या पथ विभागाकडून १ जून ते १८ ऑगस्ट या कालावधीत शहरातील ११ हजार ४१८ खड्डे बुजविल्याचा दावा केला असला तरी तो किती निरर्थक आहे, याची प्रचिती सर्वच रस्त्यांच्या दुरवस्थेवरून दिसून येत आहे. खरोखरच हजारोंच्या संख्येने खड्डे बुजविले असतील तर खड्ड्यांचे साम्राज्य कमी का हाेत नाही, याचे कोडे सामान्यांना पडले आहे.
महापालिकेच्या पथ विभागाच्या मुख्य खात्याकडून शहरातील १२ मीटर पेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांची बांधणी व देखभाल - दुरुस्ती केली जाते. तर बारा मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची बांधणी व देखभाल - दुरुस्ती ही क्षेत्रीय कार्यालयामार्फत केली जाते. शहरातील खड्ड्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पथ विभागाकडून रस्त्यांच्या स्थितीचा अहवाल मागविला हाेता. यामध्ये दाेष दायित्व कालावधीत ( डिफेक्ट लायबिलिटी पिरीयड) असणाऱ्या व पावसाळ्यात खड्डे पडलेल्या रस्त्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शहरातील १७ रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याचे स्पष्ट झाले हाेते. दरम्यान यात दोषी असलेल्या ५ ठेकेदारांकडून ४ लाख ८५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून, २ ठेकेदारांना नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच ४ ठेकेदारांनी रस्ते दुरुस्त करून दिल्याचा दावा महापालिकेने केला आहे.