वाढत्या घरफोड्यांनी पुण्यातील नागरिक त्रस्त; गस्त वाढविण्याच्या रश्मी शुक्ला यांच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:55 AM2017-12-20T11:55:36+5:302017-12-20T11:58:43+5:30
शहरात गेल्या काही दिवसांमध्ये दररोज ३ ते ४ घरफोड्यांच्या घटना घडत असून त्यामुळे या घरफोड्यांनी पुणे पोलीस त्रस्त झाले आहेत़ त्यात पु. ल. देशपांडे यांच्या निवासस्थानी घरफोडी झाल्याने संपूर्ण पोलीस दल कामाला लागले आहे़.
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांमध्ये दररोज ३ ते ४ घरफोड्यांच्या घटना घडत असून त्यामुळे या घरफोड्यांनी पुणे पोलीस त्रस्त झाले आहेत़ त्यात पु. ल. देशपांडे यांच्या निवासस्थानी घरफोडी झाल्याने संपूर्ण पोलीस दल कामाला लागले आहे़ पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी जातीने यात लक्ष घालून तातडीने गुन्हेगारांचा शोध घेण्याचा आदेश दिला आहे़
शहरातील उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांत दररोज घरफोड्या होताना दिसत असून सिंहगड रोड, हडपसर, कर्वेनगर, वारजे, बाणेर या परिसरात त्यांचे प्रमाण अधिक आहे़ त्यात गेल्या दोन दिवसांत डेक्कन जिमखानासारख्या परिसरात दोन घरफोडीच्या घटना घडल्या़ फर्ग्युसन रोडवरील वैशाली हॉटेलच्या शेजारील गल्लीतील मधुबन सोसायटीत डॉ़ अविनाश कुलकर्णी यांचे घर बंद होते़ डॉ़ कुलकर्णी हे शनिवारी आपले घर बंद करून राजगुरुनगर येथील वाडा या गावी गेले होते़ सोमवारी सकाळी परत आल्यावर त्यांच्या घर फोडलेले आढळून आले़ चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व बेडरूममधील कपाटातील ३ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ त्याशिवाय चोरट्यांनी त्यांच्या शेजारील दोन फ्लॅटचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला़
अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त शरद उगले व अन्य अधिकाऱ्यांनी तातडीने भांडारकर रोडवरील मालती माधव सोसायटीला भेट दिली़
याबाबत अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी सांगितले, की घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली आहेत़ घरफोड्या रोखणे आणि त्यांचा तपास अशा दोन्ही पातळीवर काम करण्यात येणार आहे़ त्यादृष्टीने पोलीस ठाण्यांना काही दिवसांपूर्वीच गस्त वाढविण्यास सांगितले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू करण्यात आली आहे़ या गुन्ह्याचा लवकरच तपास लागेल, यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत़
जंगली महाराज रोडवरील ओमकारगड अपार्टमेंटमध्ये घरफोडी करून ३ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना रविवारी घडली होती़ चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने व डायमंडचे घड्याळ असा ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ त्यानंतर मंगळवारी सकाळी पु़ ल़ देशपांडे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्र्रकार उघडकीस आला़ या गुन्ह्याचे वृत्त सर्वत्र पसरल्यानंतर शहर पोलीस खडबडून जागे झाले़